वारी आणि पंढरी
°°°°°°°°°°°°°°°°
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले होचंद्रभागा तीर
या ओळींनी पंढरपूर डोळ्यासमोर उभे राहिल्या शिवाय
राहत नाही. पंढरीच्या वारीला जाताना एवढ्या लोकांच्या
पायात कुठून बळ येत हे खरंच अगम्य आहे.ही ताकद,
हे सामर्थ्य, ही शिस्त ,विठू नामाच्या गजरातील कम्पन
लहरींमुळे निर्माण होणारं अद्भुत असं वातावरण,उत्साह
आणि जल्लोषातील पावित्र्य,भेदाभेद विसरून ,अहंकार
बाजूला ठेवून विठू चरणी लीन होणारे वारकरी अगदी
स्वतः चे नाव विसरून सगळेच ” माऊलीमय” होऊन
जातात.
आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असे सांगितले जाते. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले, अशी मान्यता आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी मिळते,
“आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी।”
संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात म्हणतात,
“जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर। “
पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. म्हणूनच इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा अनेक जण बाळगून असतात. सप्तपुर्यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे, असे सांगितले जाते.
विष्णू आणि शंकराची
तिर्थक्षेत्रे अविनाशी,
एक विठूची पंढरी
शिव शंभूचे ते काशी
जसे एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले जाते. तसे, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने सांगितले जाते. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो, असे म्हटले जाते.
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना, अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत सुरू आहे. कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.
व्यष्टी आणि समष्टिचा
इथे विचार रंगला,
मोठया मोठ्या संतांनी
त्यांचा मानस मांडला
आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.
वारी म्हणजे समरसता आणि सहनशीलता. सामाजिक पोत बिघडू नये तर तो घट्ट व भरीव राहावा यासाठी वारीचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. वारी ही कृती नसून जीवनशैली आहे.वारीत संत साहित्याची सखोलता जाणवते व वारकऱ्यांच्या अचूक पाठांतराचे कौतुक देखील. म्हणूनच वारी म्हणजे समरसता आणि सहनशीलता. “सामाजिक पोत” बिघडू नये तर तो घट्ट व भरीव राहावा यासाठी वारीचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. वारी ही कृती नसून जीवनशैली आहे. निर्व्यसन, शाकाहार, सहिष्णुता व कोणत्याही कसोटीवर टिकणारं आत्मबळ वारी परंपरा आपल्याला देते. याचं समर्पक उदाहरण म्हणजे वारी परंपरेतील एकही शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला नाही. आत्मशोध-आत्मबोध व आत्मबळ ही वारीची त्रिसूत्री आहे. या साऱ्याचा निदान हलका गंध जाणवण्यासाठी प्रत़्येकाने किमान एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा, असं आवर्जून संागावसं वाटतं.
©®रोहिणी पांडे
(शब्दनक्षत्र)