सलग अठराव्या वर्षी वैद्यकीय पथक रवाना
लातूर/प्रतिनिधी: पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय पथक रवाना झाले.संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर व मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून हे पथक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. मागील १८ वर्षांपासून विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी वारीमध्ये सहभागी होते.यावर्षीही हे पथक रविवारपासून वारीत सहभागी होत आहे. विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर यांच्या हस्ते यावेळी रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सौ.अरुणा देवधर,डॉ.गोपीकिशन भराडिया,संस्था सचिव डॉ.राशेशाम कुलकर्णी,प्रशासकीय अधिकारी डॉ.गौरी कुलकर्णी,डॉ.ब्रिजमोहन झंवर,डॉ.संतोष देशपांडे, डॉ.अभय सावरगांवकर, डॉ.टिके,कर्मचारी व्यवस्थापक अजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सहदेव गावकरे हे वारीत सहभागी होणाऱ्या पथकाचे प्रमुख आहेत.या पथकात डॉ.भुजंग चिवडे, दगडू जाधव,महेश पंडगे, नवनाथ दंडीमे,प्रताप चव्हाण यांच्यासह चालक राजाभाऊ ठाकूर यांचा समावेश आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पथकात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांवर उपचार करणारे रुग्णालयाचे कर्मचारी हे वारकरी नव्हे तर धारकरी आहेत.ही समाजसेवा आहे.संस्थेने समाजाची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची निवड केलेली आहे.या सेवेत समाजाचाही सहभाग आहे.औषध पुरवठादार आणि वैद्यकीय प्रतिनिधींकडून रुग्णांना देण्यासाठी औषधाचा पुरवठा केला जातो.काही पुरवठादार अत्यल्प दरात औषधी उपलब्ध करून देतात.रुग्णालयातील कर्मचारी आपल्या वेतनातील हिस्सा यासाठी देतात.वारकऱ्यांच्या सेवेतून आनंद मिळतो, असेही ते म्हणाले. डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांनी सांगितले की,१० हजार रुग्णांवर उपचारासाठी पुरेल एवढी औषधी या पथकासोबत असते.पथकासोबत तंबूची व्यवस्था करण्यात आली असून त्यात रुग्णावर उपचार केले जातील. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.