लातूर/प्रतिनिधी:हरिनामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय पथक गुरुवारी (दि.३० जून )रवाना झाले.विवेकानंद रुग्णालयाच्या वैद्यकीय वारीचे हे अठरावे वर्ष आहे. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी होऊन चालत पंढरपुरकडे जातात.या वारकऱ्यांना चालताना येणाऱ्या आरोग्य समस्यांच्या निराकरणासाठी विवेकानंद रुग्णालयाने २० वर्षांपूर्वी आरोग्य पथक पाठविण्यास सुरुवात केली.कोरोनाचे दोन वर्ष वारी बंद असल्याने पथक पाठवता आले नाही.यावर्षी वारी सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा विवेकानंद रुग्णालयाचे पथक सेवेसाठी रवाना झाले. गुरुवारी सायंकाळी संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून पथक रवाना करण्यात आले.

पथकात सहभागी असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे कार्यवाह डॉ.राधेश्याम कुलकर्णी,प्रशासकीय अधिकारी डॉ.गौरी कुलकर्णी,डॉ.आकाश हौशटे,श्रीनिवास नक्का,डॉ सुवर्णा बागडे,डॉ अश्विनी जाधव,डॉ अश्विनी कुलकर्णी,डॉ.अभय सावरगावकर,ओमप्रकाश येलनारे,डॉ.अर्चना कासले,रमेश माडजे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या वैद्यकीय पथकामध्ये डॉ. आकाश अवशेट्टे,चालक राजाभाऊ साळुंके यांच्यासह गोविंद सावंत,सहदेव गावकरे, संगमेश्वर बरुरे,प्रताप चव्हाण, विष्णू पंडगे या परिचारकांचा समावेश आहे.सुमारे पाच लाख रुपयांची औषधीही या पथकासोबत पाठवण्यात आली आहे.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर म्हणाले की,वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्याच्या हेतूने रुग्णालयाकडून दरवर्षी पथक पाठवण्यात येते. विविध कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींकडून या वारीसाठी अडीच लाख रुपयांची औषधी देण्यात आली आहे.याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून तीन लाख रुपयांची औषधी पाठवण्यात आलेली असल्याचे ते म्हणाले.विशेष म्हणजे या सेवेसाठी रुग्णालयाचे कर्मचारी कोणताही विशेष मोबदला घेत नसल्याची माहितीही त्यांनी दिली.