औसा/प्रतिनिधी :
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्हास्तरीय वारकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थापक श्री विठ्ठल काकाजी आणि ह भ प माधव महाराज शिवणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
यावेळी ह भ प दत्तात्रय पवार गुरुजी, संयोजक सईताई गोरे, श्रीधर धुमाळ, सतीश खडके, वसंत कदीर, यशवंत शिंदे, व्यंकट पवार, बळी दळवे, चंद्रकांत राऊत, गणेश सावंत, भागवत गोरे, रमेश काकडे, नवनाथ मेहत्रे, सुखाचार्य साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ह. भ. प. विठ्ठल काकाजी महाराज यांनी प्रास्ताविक करून वारकरी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील कामकाजाची सविस्तर माहिती विशद केली. वारकरी साहित्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार म्हणाले की महाराष्ट्र या संताच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाने समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करीत समाज प्रबोधन करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे समाजामध्ये भक्तीभाव वृद्धिंगत होण्यास मदत होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची दिलेली शिकवण ही अत्यंत मोलाची असून त्यांच्या विचाराचे अनुकरण करणेही आज काळाची गरज आहे. असेही या प्रसंगी बोलताना आमदार पवार म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेच्या संमेलना निमित्त सकाळी ११ वाजता किल्ला मैदान येथून श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय पर्यंत वारकरी हातात भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल नामाच्या गजरात श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालयामध्ये दिंडीचा समारोप संमेलनामध्ये झाला. वारकरी साहित्य परिषदेच्या संमेलनामध्ये अखंडपणे वारकरी संप्रदायाचा वारसा चालवीत सांप्रदायाची सेवा केल्याबद्दल काही वारकऱ्यांना मरणोत्तर विठ्ठल वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वारकरी संप्रदायाच्या कार्याला सतत सहकार्य करणाऱ्या आदर्श सरपंच, आदर्श पत्रकार, आदर्श शेतकरी व आदर्श डॉक्टरांचा शाल, पुष्पहार व विठ्ठलाची श्री मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या संमेलनामध्ये लातूर जिल्ह्यातून शेकडो वारकरी व महिला भजनी मंडळाच्या सदस्य उपस्थित होते. सर्वश्री विष्णू कोळी, रामराजे पवार, नरहारी माळी. नेताजी जगताप, काकामाळी, ज्ञानेश्वर आजने, अंगद जाधव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी मोलाचे सहकार्य केले.