प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
सोलापूर, दि. 6 (जि. मा. का.) : पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी तळ व मार्गावरील तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे सूचिबद्ध करून विहित वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी पालखी सोहळा व्यवस्थापनासाठी नेमणूक केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज येथे दिल्या.

संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावरील करावयाच्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, सहायक आयुक्त समाज कल्याण एन. आर. चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क नितीन धार्मिक, तहसीलदार अमरदीप वाकडे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले, पालखी महामार्गावरील प्रलंबित कामे, अडथळे वेळेत दूर करावेत. पालखी विसाव्याच्या ठिकाणी जाणे-येणेकरिता असलेल्या रस्त्याची डागडुजी करावी. पालखी मार्गावर आवश्यकेनुसार सर्व्हिस रोड, रँप (दोन स्वतंत्र रस्ते), जागेचे सपाटीकरण, मुरूम भराई करून रस्त्याचे मजबुतीकरण, स्वच्छता व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी कार्यवाही करावी. पालखी तळाची साफसफाई करावी. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखीतळावर तसेच विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात, असे त्यांनी सूचित केले.
तसेच सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या विभागांशी व संपूर्ण पालखी मार्गावरील सेक्टर इन चार्ज यांच्याशी वेळोवेळी समन्वय ठेवावा. सर्व नोडल अधिकाऱ्यांना डिजीटल डायरी व पालखी मार्गाचे नकाशे देण्यात येतील. आषाढीवारी शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पडावी, याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000