टीईटी घोटाळ्यात सुशील खोडवेकर अटकेत
पुणे पोलिसांची कारवाई ः परभणीतीलही कारकिर्द वादग्रस्तच ठरली
परभणी,दि.29(प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी सनदी अधिकारी सुशिल खोडवेकर यांना शनिवारी दुपारी ठाण्यातून अटक करीत मोठी खळबळ उडवली.
दरम्यान, खोडवेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. याही ठिकाणी स्वच्छ भारत अभियानात एका कंत्राटात खोडवेकर यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला. तो विधीमंडळ अधिवेशनातसुध्दा गाजला. त्यांच्या उर्मट वर्तनूकीचे किस्सेही गाजले होते, हे विशेष.
सद्यस्थितीत मंत्रालयात उपसचिव असणारे सुशिल खोडवेकर या वादग्रस्त सनदी अधिकार्याने टीईटी परिक्षेत केलेल्या घोटाळ्या प्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी दिली. दुपारी खोडवेकर यांना पुणे येथील न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिक्षक पात्रता परिक्षेत (टीईटी) अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परिक्षार्थींपैकी पुन्हा पैसे देवून उत्तीर्ण झाल्याची खळबळजणक माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली.
टीईटी 2021 च्या परिक्षेत अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परिक्षार्थींना संबंधितांच्या साखळीने पैसे देवून पास केले. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आली. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताब गुप्ता यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना या संदर्भात काही जिल्ह्यातील उमेदवारांची नावे समोर आली आहेत, असे स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परिक्षेतील घोटाळ्यात रोजच नवनविन माहिती समोर येत आहे. विशेषतः बडे मासेसुध्दा हाती लागत आहेत. त्यात अपात्र ठरलेल्या हजारो परिक्षार्थींना पुन्हा पात्र ठरविल्याची बाब समोर आल्यानंतर शैक्षणिक वर्तूळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आधारेच त्या परिक्षार्थींनी पैशाची देवाण-घेवाण करीत संबंधित संस्थांमधून नोकरी मिळविली, टिकविली. या बोगस शिक्षकांविरुध्द आता पुणे पोलिसांसह शिक्षण विभागाद्वारे काय कारवाई होणार? याकडे शैक्षणिक वर्तूळाचे पूर्णतः लक्ष लागले आहे.
2019-20 च्या परिक्षेत एकूण 16 हजार 592 परिक्षार्थींना पात्र ठरविल्या गेले होते. मात्र पुणेच्या सायबर विभागाने केलेल्या तपासणीत प्रत्यक्ष निकाल पडताळल्यानंतर तब्बल 7 हजार 800 परिक्षार्थी हे अपात्र असल्याची बाब समोर आली. यात काही जिल्ह्यातील परिक्षार्थी उमेदवारांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.