वाढदिवस विशेष

0
355

*दात तुटतील.. पण..ही दोस्ती तुटायची नाय!*

*निर्मळ मनाच्या सुभ्याची एकसष्ठी*

 

दोस्त आणि दोस्तीच्या आघाडीवर परमेश्वराने मला भरभरुन श्रीमंती बहाल केली आहे.त्याच श्रीमंतीच्या खजिन्यातील एक मौल्यवान दागिना म्हणजे बार्शीतील यशस्वी उद्योजक-व्यापारी सुभाष श्रीकिसन डाळे आमचा सुभ्या! माझा शाळकरी जीवनापासूनचा दोस्त.परवा आम्ही त्याची एकसष्ठी एन्जॉय केली आणि मला तो प्रसंग आठवला..खरं सांगतो,एका जमान्यात मी क्रिकेट चांगलं खेळायचो..४१-४२ वर्षांपूर्वीची ही घटना… बार्शी ईलेव्हन टीमचा मी ओपनिंग बॅट्समन तर सुभ्या आमच्या टीमचा विकेटकीपर.. बार्शीच्या शिवशक्ती मैदानावर आमची सोलापूर बरोबर मॅच होती.‌. मैदानावर मॅचची संपूर्ण तयारी झाली होती. आता दोन कॅप्टन टॉस करणार आणि सामना सुरू होणार.. बॅटिंग आली तर मी ओपनर असल्याने पॅडअप करुन तयार होतो.सुभ्या देखिल विकेटकिपर असल्याने फील्डिंग आली तर तयार असावे म्हणून पॅड बांधून तयार होता.. एवढ्यात तिथे लुनावर (आमच्या पिढीची मोपेड) मुकुंद सोमाणी नावाचा माझा मित्र आला.. टॉसला थोडा वेळ असल्याने मैदानाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला जायचा आग्रह करु लागला.. माझ्या स्वभावानुसार मीही आग्रहाला फशी पडलो. तशाच अवस्थेत गडबडीने लुनावर डबलसिट बसून रवाना झालो.. मी तिकडे आणि इकडे काही मिनिटांतच अम्पायर्स मैदानावर दाखल झाले.आमच्या टीमचा कॅप्टन युसुफ तांबोळीने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी सोलापूरची टीम मैदानावर उतरली..मी मात्र तिकडे हॉटेलमध्येच!.. माझी शोधा शोध झाली… अखेर एरवी पाचव्या-सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला जाणाऱ्या सुभाषला पॅड बांधून तयार असलेल्या ओपनिंगला जाण्यास सांगण्यात आले.. भरपूर रोलिंग करुन त्यावर मॅटिंग.. नवा लेदर बॉल आणि समोर त्या काळी गाजलेला फास्टबोलर नितीन देशमुख.. त्या काळात थायगार्ड, हेल्मेट वगैरे काही नव्हते… सुभाषने स्टान्स घेतला.. नितीन देशमुखचा बोलिंग रनअप सुरु झाला.. पहिले दोन बॉल सुभाषने फ्रंटफुटवर डिफेन्स केले… तिसरा बॉल मात्र सुसाट गतीने उसळला आणि.. सुभाषच्या तोंडावर आदळला.. सुभाष कोसळला.. रक्तबंबाळ.. तोंडातून रक्त वाहू लागले..त्याला तातडीने दवाखान्यात नेले गेले.. उपचार सुरु झाले..सात दात निखळले तर एक दात तुटला..अनेक दिवस तोंड बंद.. उपचारासाठी सोलापूरला जावे लागले. तब्बल तीन महिन्यांच्या उपचारानंतर निखळलेले सात दात वाचले!..पण तुटलेल्या एका दाताची जागा मात्र नकली दाताला द्यावी लागली.नकली दातानेही फार काळ साथ दिली नाही. उदय टॉकीजला कोणता तरी सिनेमा पहायला गेला होता.

 

सिनेमातील एका कॉमेडी सीनला सुभाषने आपल्या निखळ हास्याची दाद दिली..त्या मनमुराद हास्यात नकली दात निघून गेला.. सिनेमा संपल्यावर थिएटरभर दात धुंडाळला.पण तो सापडलाच नाही.तेव्हापासून सुभाषने नकली दाताचा विषयच सोडून दिला..अस्सा आमचा जीवलग सुभाष! काळ लोटत राहिला.दुनियादारीचे चक्र फिरत राहिले..आमची मैत्री मात्र सदैव बहरत राहिली.एकवेळ आनंद प्रसंगी नसेल पण संकट समयी मात्र जीवाला जीव द्यायला सुभाष हजरच! उद्योग व्यवसायाबरोबरच आज त्याने अंबिका योग कुटिरचे प्रमुख व ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रसाद कुलकर्णी या मित्राच्या मार्गदर्शनाखाली योगविद्येत विशेष प्राविण्य संपादन केले आहे. आशा दिलदार आणि जिगरबाज मित्राची एकसष्ठी आम्ही रामलिंगच्या डोंगरात साजरी केली‌. या आनंदाचे भागिदार सुभाष साखरे, कुमार कंकाळ,शिवराज खंडेलवाल, सूर्यकांत वायकर, विजय हावळे, संजय स्वामी, बापू गपाट, प्रशांत माळवदे,डॉ.ना.पा. कुलकर्णी, मल्लिकार्जुन गाडवे, दिपक सावळे महेश आशर आणि मी होतो.

*-राजा माने.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here