इतिहासाचे लेखन हे
“नो डॉक्युमेंट, नो हिस्टरी” या मुलभूत तत्त्वानुसार पूर्णपणे संशोधनावर आधारित असे असले पाहिजे,असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच मुंबई येथे बोलताना केले. ते निवृत्त पुराभिलेख संचालक तथा इतिहास संशोधक
डॉ भास्कर धाटावकर यांनी लिहिलेल्या छत्रपती संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे,
आंग्रेकालीन अलिबाग परिसरातील ऐतिहासिक स्थळे ,सफर कॅनडा आणि अमेरिकेची या चार पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री चव्हाण पुढे म्हणाले की, इतिहासात घडलेल्या घटना आता आपण बदलवू शकत नाही,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे इतिहासातील गोष्टींनी विचलित न होता त्यांचे तटस्थ राहून मूल्यमापन केले पाहिजे.कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही,याची आपण दक्षता घेतली पाहिजे.

आपण एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये शिकत असताना,तळ मजल्यावर असलेले
जुन्या कागदपत्रांचे ठिकाण हे पुराभिलेख खात्याचे कार्यालय असल्याचे पुढे या खात्याचे मंत्री झाल्यावर कळाल्याचे सांगून त्यांनी
डॉ भास्कर धाटावकर यांच्या कार्य शैलीचे,शांत व संयमी स्वभावाचे कौतुक केले.
या प्रसंगी अन्य प्रमुख पाहुणे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे निवृत्त प्रमुख
डाॅ.अरविंद गणाचारी , ज्येष्ठ अभिनेते -दिग्दर्शक
श्री राजन बने,ज्येष्ठ पत्रकार श्री सदानंद खोपकर, ज्येष्ठ पत्रकार यांची डाॅ.भास्कर धाटावकर यांच्या पुस्तकांसंदर्भात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात
डॉ भास्कर धाटावकर
यांनी त्यांच्या संशोधन कार्याचा प्रवास, पुराभिलेख विभागाचे संचालक म्हणून करता आलेले कार्य व नव्या पुस्तकांविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते
श्री अभय कुलकर्णी यांनी अत्यंत खुमासदार पणाने केले. तर आभार प्रदर्शन सौ उषा धाटावकर आणि श्री राहुल धाटावकर यांनी केले.
डॉ भास्कर धाटावकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विविध मान्यवर , डॉ धाटावकर यांचे स्नेही, आप्त, कुटुंबीय मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

लेखन:देवेंद भुजबळ
☎️9869484800