लातूर – ब्राह्मण समाजातील विवाह इच्छुकांचे विवाह जुळवण्यासोबतच एकमेकांच्या परिवारांचे नाते जोडण्यासाठी वधू वर सूचक मेळावे हे प्रभावी माध्यम आहे ते अधिक दृढ होण्यासाठी विवाह सूचक मंडळांनी आपली विश्वासार्हता जपणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वामन पाठक यांनी लातूर येथे केले.
लातूर येथे ब्राह्मण वधु वर पालक थेट भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वर पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक सोलापूर तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी वामन पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम विद्वत परंडा, तर मार्गदर्शक म्हणून रवींद्र दुसे लातूर यांची उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी शासनमान्य स्वप्नाली वधू वर सूचक मंडळ औसा, ब्रह्मवार्ता वधू वर सूचक मंडळ परंडा, यांनी पुढाकार घेतला होता.

यावेळी बोलताना वामन पाठक पुढे म्हणाले की ब्राह्मण समाजामध्ये मुलींची संख्या कमी झाली आहे त्यामुळे समाजातील विवाह जुळून येत नाहीत असा गैरसमज समाजामध्ये निर्माण झाला आहे. तर ब्राह्मण समाजामध्ये मुलींची संख्या कमी नाही. तर मुलींच्या पाल्यांची आणि विवाह इच्छुक मुलींची भावी आयुष्याबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वांनाच मोठ्या पगाराचा, मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, मोठ्या कंपनीत काम करणारा, पुणे मुंबई औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या घरामध्ये वास्तव्य करणारा वर अपेक्षित आहे. परंतु सध्या ब्राह्मण समाजामध्ये नोकरी लागून कार्य करणाऱ्या मुलांची संख्या अगदीच नगण्य आहे. तर कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलांची संख्या ही मोजकीच आहे. तर अनेक मुलांना या दोन्हीही अटींची पूर्तता होत असली तरी शेती आणि अन्य अटी पूर्ण करणारा वर मिळत नसल्यामुळे विवाह जुळून येण्यामध्ये अडचणी निर्माण झाले आहेत. आता केवळ मुली आणि त्यांच्या पाल्यांनी त्यांच्याकडून ठेवण्यात येत असलेल्या अपेक्षा कमी केल्यानंतर बहुतांश मुलामुलींचे विवाह जुळून येतील, परंतु पाल्य आपल्या मुला मुलींचे विवाह जुळवण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. तर काही विवाह इच्छुकांनी वधुवर सुचक मंडळामध्ये नाव नोंदणी करून त्यांच्या भरवशावर आपल्या मुला मुलींचा विवाह जुळून येईल असा विश्वास ठेवून आपला नित्य उपक्रम करत आहेत. विवाह इच्छुक मुला मुलींच्या पाल्यांना आपल्या मुला मुलींचा विवाह योग्य वेळेत जुळवून आणावयाचा असेल तर पूर्वीप्रमाणे प्रत्येकाने वर संशोधनासाठी स्वतः आपल्या कार्यातून वेळ काढून घराबाहेर पडले पाहिजे. केवळ वधू वर सूचक मंडळ आणि समाज माध्यमावर येणाऱ्या परिचय पत्रावर आधारित न राहता त्याचा केवळ स्त्रोत म्हणून उपयोग करून घ्यावा आणि या परिचय पत्रातील माहिती त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत तरच आपल्या मुला मुलींचे विवाह योग्य वयामध्ये जुळून येतील आणि आपली समस्या लवकर सुटेल. असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले .
या वधू वर पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे श्रीराम विद्वत परंडा आणि मार्गदर्शक रवींद्र दुसे संयोजक गोपाळ सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या विवाह इच्छुक वधूवरांनी आपला परिचय करून दिला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून 125 वधूवरांनी आपली नाव नोंदणी करून उपस्थिती लावली होती तर अनेकांनी भ्रमणध्वनी वरूनही नाव नोंदणी करून आपले परिचय पत्र वधुवर सुचक मंडळाकडे पाठविले होते या वधू वर सूचक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुजाता सराफ, यांनी पुढाकार घेतला होता.