शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
वैभव रेकुळगे,
वडवळ नागनाथ, दि.१९ – चाकुर तालुक्यातिल वडवळ नागनाथ सह परिसरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची नासाडी झाली असून भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून तातडीची आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यातुन केली जात आहे.
शनिवारी दुपारी अचानक हवामानात बदल होवुन वडवळ नागनाथ, वाघोली, खुर्दळी या परिसरात विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात गारपीट ही झाली. या अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने शेतातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई पिकांसह टोमॅटोसह, गोबी, दोडका या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील पिकांचा घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातुन केली जात आहे.