लोदगा पॅटर्न पोहोचला कर्नाटकात

0
217

कर्नाटकात राबवणार बांबू लागवडीचा लोदगा पॅटर्न… 

पहिल्या टप्प्यात २५ हजार बांबू लागवडीचा निर्धार… 

निलंगा,-(प्रशांत साळुंके)- शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या बिदर जिल्हा बांबू उत्पादक संघाच्या वतीने बीदर जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात बांबू लागवड करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पाशा पटेल यांनी बांबू लागवड व त्यापासून उत्पादित होणाऱ्या चळवळीचे केंद्र जसे लोदगा येथे उभारले आहे त्याच पद्धतीने कर्नाटकातही बांबू चळवळ गतिमान करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला.

मेहकर येथील मठाचे राजेश्वर स्वामीजी,केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांचे ज्येष्ठ बंधू गणपतराव खुब्बा,प्रशांत होळसमुद्रकर,सत्यवान पाटील,येसाजी पाटील,संजू प्रभा,गोविंद बिरादार,अरुण पाटील,बंटी नायक,दयानंद पाटील,सागर माका,मल्लप्पा दाना यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोदगा येथे भेट देऊन बांबू चळवळीविषयी माहिती घेतली.बांबू लागवड,टिशू कल्चर लॅब,बांबू पासून तयार केले जाणारे फर्निचर याबाबत या शिष्टमंडळाने संपूर्ण माहिती घेतली.राजेश्वर स्वामीजी व गणपतराव खुब्बा यांनी पहिल्या टप्प्यात २५ हजार बांबू लागवड करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.पूर्ण कर्नाटकात बांबू लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

बांबूची लागवड,जोपासना या संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन द्यावे तसेच फर्निचर तयार करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी केली.फर्निचर निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ५० मुलांना लोदगा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजेश्वर स्वामीजी म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.यामुळे २०५० सालापर्यंत मुंबई शहर तसेच बांगलादेश व श्रीलंका यासारखे देश पाण्याखाली बुडण्याची भीती आहे.इंग्लंड सारखा देश पूर्णपणे बर्फाखाली गाढला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे प्रकार होऊ नयेत यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी गतीने वाढणारे,२४ तास ऑक्सिजन देणारे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करणारे बांबूचे झाड लावले पाहिजे. आपण मठाच्या पूर्ण शेतीमध्ये बांबू लागवड करणार आहोत. संपूर्ण कर्नाटक राज्यात बांबू लागवड करून मानव

जातीच्या रक्षणाच्या कार्यात सहभागी होणार असल्याचे मत स्वामीजींनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

मागील अनेक वर्षांपासून बांबू लागवड व जोपासनेसह देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी पाशा पटेल काम करत आहेत.याबद्दल राजेश्वर स्वामीजी यांनी पारंपारिक पद्धतीचा विशेष टोप आणि शाल घालून पाशा पटेल यांचा सत्कार केला. भविष्यात त्यांच्या हातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी असेच कार्य होत राहो,अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here