लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा संयुक्त आढावा
• लातूर आणि बिदर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आंतरराज्य बैठक
• निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही होणार
लातूर, दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबतच लातूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा प्रशासनासोबत संयुक्तपणे कार्यवाही करून सीमाभागात निवडणूक काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज दोन्ही जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी रमेश चाटे यांच्यासह उदगीर, निलंगाचे उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि बिदर जिल्ह्यातील पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे बिदरचे जिल्हादंडाधिकारी गोविंद रेड्डी, पोलीस अधीक्षक चेन्नाबसवन्ना लंगोटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

लातूर आणि बिदर जिल्ह्याच्या सीमाभागात चेकपोस्ट आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास मनुष्यबळाचा प्रभावी वापर करणे शक्य होईल. तसेच परस्पर सहकार्याने इतर कार्यवाही अधिक गतीने करता येईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. महावरकर यांनी सांगितले. या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले.
लातूर लोकसभा मतदारसंघ आणि लगतच्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात निवडणूक काळात गैरप्रकार होवू नयेत, निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सीमाभागात दोन्ही जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तपणे उपाययोजान करणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. सीमाभागात या उपाययोजना राबविण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने एकत्रितपणे कार्यवाही केल्यास अधिक परिणामकारक ठरेल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.

कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक काळात बिदर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले होते. आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यात एकाच वेळी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाच्या समन्वयातून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी बिदर जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोतपरी सहकार्य केले जाईल, असे बिदरचे जिल्हादंडाधिकारी गोविंद रेड्डी यांनी सांगितले. तसेच बिदर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
आगामी काळात सीमाभागात संयुक्तपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी बिदर पोलीस दलाची मदत घेतली जाईल. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील सीमाभागातील अवैध कृत्यांना प्रतिबंध करणे शक्य होईल, असे लातूरचे पोलीस अधीक्षक श्री. मुंडे म्हणाले.
लातूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. देवरे यांनी लातूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनामार्फत सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजना, तसेच या अनुषंगाने बिदर जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्याकडून अपेक्षित सहकार्य याबाबत माहिती दिली.
