पिंपरी – भविष्यात सर्व माध्यमे एका विशिष्ठ कुटूंबांच्या हाती जाणार आहेत. माध्यमे हाती घेणे ही मत, लोकशाही नियंत्रणात ठेवण्याची प्रक्रीया आहे. सत्ताबदलाची सुरुवात पत्रकारीतेतून होते. अन्य स्तंभ हतबल, नियंत्रणाखाली गेल्याने लोकशाहीचा चौथा नव्हे तर पत्रकारीता पहिला स्तंभ झाला आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची देशातच नव्हे तर जगात पत्रकारीतेची जबाबदारी वाढली आहे. लोकशाही वाचविण्याच्या संघर्षाला माझा पाठींबा आहे, असे मत जेष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी शनिवारी (ता. १९) पिंपरी-चिंचवड येथे व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांच्या ४३ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश सिंह, आमदार अशोक पवार, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आदि उपस्थित होते.
केतकर म्हणाले की, वृत्तपत्र स्वतंत्र्यांचा प्रश्न फक्त महाराष्ट्रात नसून जगभरात आहे. आपल्याला लढायचे आहे ते स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या विरोधात. ग्रामीण भागात वेगवेगळे दबाव गट असतात. त्याला लढा देत, सांभाळत बातमीदारी करावी लागते. वृत्तपत्रात वाचकांना प्रतिवादाची करण्याची संधी असते. न्युज चॅनेलवर वाचकांचा प्रतिवाद नसतो. त्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाच्या विषयाला माझा पाठींबा आहे.
भारत जोडो यात्रेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. आयोजकांच्याही अपेक्षेपेक्षा जादा प्रतिसाद मिळत आहे. तरुण, मुली, महिला, जेष्ठ अशा सर्वच स्तरातील लोक या यात्रेत सहभागी होत आहेत. लोकांची गर्दि वाढतेय, वातावरण तापतेय. राहुल गांधी नुसते चालत नाहित तर, ते लोकांशी संवाद साधतात. कमीत कमी दोन हजार विद्यार्थ्यांशी ते बोलले, त्यांना काय शिकायचेय, त्यांना वाटणारी भिती, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, असे केतकर यांनी सांगितले.
रामदास आठवले म्हणाले की, कोरोना काळात शासनाने अनेक घटनांना मदत जाहीर केली. तशी पत्रकारांसाठी देखील मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. पत्रकारांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणी मोदींना माहिती आहेत. त्यामुळे मोदी हे पत्रकारांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी स्वतः त्यांना बोलणार आहे.कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार हेमंत जोगदेव यांना पवना समाचारकार भा. वि. कांबळे पुरस्कार देवून गौरविण्यात आले. स्वागतपर भाषण बाळासाहेब ढसाळ यांनी केले. प्रास्तविक विश्र्वस्त किरण नाईक यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी व अनिल वडघुले यांनी आभार मानले.
फडणवीस व शिंदे सरकार बदलण्यात ‘पटाईत’
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार यापुढेही २० वर्षे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात पटाईत आहेत. सगळ्यांना सत्ता मिळत नाही. तशी मंत्रीपदीही सर्वांना संधी मिळत नाही. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला की, मंत्रीपदी संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी होऊन हे सरकार पडेल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र; सरकार पडणार नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले