लोकनायक संघटनेने मनपाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठिय्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूची जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्याबाबत आयुक्तांना दिले निवेदन.
लातूर;( प्रतिनिधी) : –लोकनायक संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूची जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्यात यावी व गंजगोलाईतील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आज दि. 17 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महापालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
लोकनायक संघटना वतीने या अगोदर मनपाला निवेदने देऊन उपोषणेही केलेली आहेत. त्याचबरोबर तत्कालीन पालक मंत्री कामगार मंत्री मा. ना.श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुद्धा त्यांना निवेदन दिल्यानंतर मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी 5 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. कालांतराने पालकमंत्री पद संपल्यानंतर आमदार अमित देशमुख यांना देखील मागणीचे निवेदन दिले होते.
उपोषणे व वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे मनपाला सदर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केलेली आहे. मात्र ही मागणी मनपाने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे आज लोकनायक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

मनपाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सदरील जागेवरील वाहन तळ त्वरित हटवून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी दहा कोटी मंजूर करून मागणीची ताबडतोब अंमलबजावणी करावी. अन्यथा लोकनायक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
हा मोर्चा लोकनायक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव बंटी गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला तर यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते जे गायकवाड, प्रीती माऊली लातूरकर, नानासाहेब उपाडे, अमर शिंदे, अश्विन कांबळे,अतिश पाटोळे, पुरुषोत्तम चाटे, सुरेखा गवळी, उर्मिला नवगिरे, साक्षीताई लातूरकर, पपीता रणदिवे, दगडू उदार, अमित शिंदे, बिभीषण मस्के, चंद्रकांत पाटील, सुनील पात्रे, निलेश गायकवाड, बबलू शिरसाठ, पवन पौळ, इस्माईल सय्यद, विशाल रसाळ, अमोल भालेकर, मुकेश कुंटणकर, नरसिंग काळदाते, बालाजी रसाळ, धनराज कांबळे आकाश माने, प्रमोद जोगदंड यांच्यासह मातंग समाजातील महिला व पुरुष यांच्यासह भाजीविक्रेते यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.