विशेष लेख
लोकशाहीमध्ये ‘लोककल्याण’ हे ब्रीद असतं… समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी ध्येयधोरणे राबवून आर्थिक स्तराबरोबर त्याचे सामाजिक स्तर उन्चाविण्याचे काम शासन करत असते. महाराष्ट्र या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. वेगवेगळ्या योजना, प्रकल्प, राबवून त्याची अमंलबजावणी करताना लाभार्थ्याला मिळालेला लाभ योग्य वेळी मिळाला, तर त्या लाभाचे महत्व त्याच्या लेखी खूप मोठे असते. शासकीय कचेरीत खेटे मारून पदरी पडलेला लाभ त्याला खूप थकवतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाभार्थ्यांच्या दारात जाऊन त्याला शासकीय योजनेचा लाभ द्यायचे निश्चित करून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लातूर जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात 22 मे रोजी औसा येथून झाली… ‘शासन आपल्या दारी’ ही लोककल्याणाची गंगा लोकांच्या दारी पोहचते त्यावेळी लोक त्याला किती आलोट प्रतिसाद देतात… त्याचा लेखाजोखा मांडणारा हा लेख..!!
लातूर जिल्हा हा तीव्र उन्हाळ्याचा…एप्रिल आणि मे महिन्यात तर उन्हाचा चटका अधिकच वाढलेला असतो. या सगळ्या गोष्टीची जाणीव असलेल्या जिल्हा प्रशासनाने 22 मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची जिल्ह्यातली सुरुवात औसा शहराच्या बाहेर भव्य मंगल कार्यालयात खेळती हवा आणि लोकांना थंड वाटावे म्हणून जागो जागी लावलेले जंबो कुलरसह केली होती. तालुकास्तरीय कार्यक्रम होता, पण लोकांचा प्रतिसाद मात्र अत्यंत उत्साह वाढविणारा होता. संपूर्ण मंगल कार्यालय लोकांनी ओसंडून वाहत होते, त्यात स्त्रियांची संख्या लक्षणीय होती.
शासनाच्या विविध विभागांचे 60 स्टॉल
जिल्हा स्तरावरून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आणि त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला वाटून दिलेल्या जबाबदारीमुळे अत्यंत चोख नियोजन झालेले होते. शासनाच्या लोकहितकारी योजना राबविणाऱ्या महत्वाच्या विभागांनी आपले स्टॉल लावले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध योजनांची माहिती पत्रकं, विविध योजनासाठी लागणारे अर्ज, ऑनलाईन माहिती भरण्यासाठी किंवा ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यासाठीची सुविधा होती. या स्टॉलचे उदघाटन औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सर्व स्टॉलवर भेटी दिल्या.. अधिकारी, कर्मचारी यांच्यात माहिती सांगण्याचा उत्साह दांडगा होता.
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यापासून झाली. एकूण 7 हजार 9 लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ देण्याचे नियोजन अत्यंत सुनियोजित पद्धतीने केले होते. त्यामुळे नाव पुकारल्या नंतर कोणतीही गडबड न होता लाभार्थी येत होते. थेट लाभ मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अंगात उत्साह दिसत होता.
अवकाळी पाऊस आणि मदतीची तत्परता
मार्चमध्ये अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पाहणी केली. तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे केले. 10 कोटी 77 लाख रूपयाचा निधी शासनाने मंजूर केला, त्याचे वाटप झाले. एप्रिल मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस त्यात वीज पडून व्यक्ती आणि जनावरांचे मृत्यू झाले. त्यावेळीही पालकमंत्री धावून आले, शेतकऱ्यांच्या भेटीला गेले.
एप्रिल मध्ये औसा तालुक्यातील 16 जनावरं वीज पडून दगावली होती. त्यात दोन गायी, 5 म्हैस, 3 बैल, 2 गायीची वासरे आणि 4 शेळ्या होत्या. त्यात गाय आणि म्हैस साठीची मदत 37 हजार पाचशे, बैल प्रत्येकी -32 हजार, गायीचे वासरं प्रत्येकी 20 हजार, शेळ्यासाठी प्रत्येकी 4 हजार रुपये असे एकूण 4 लाख 15 हजार 500 रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात देण्यात आले.
औसा नगरपरिषदेकडून 230 दिव्यांग बांधवांना दोन लाख 30 हजाराचे दिव्यांग सहाय्यता अनुदान देण्यात आले. शहरात घर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून 356 कुटुंबांना लाभ देण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून ट्रॅक्टर पासून ते ठिबक सिंचनपर्यंतचे लाभ देण्यात आले. महिला आणि बाल कल्याण विभागाकडून पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातांना बाल संगोपन किट देण्यात आले. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मातांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी महिना 2200 रुपये देण्याची योजना आहे, त्याचेही याठिकाणी वाटप करण्यात आले.
महसूली दाखले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात आले. औसा तालुका हा शेतरस्ते करण्यात राज्यात सर्वात आघाडीवर आहे जवळपास 400 पेक्षा अधिक शेतरस्ते केल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे मार्ग निर्माण झाले आहेत, अशी भावना आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलून दाखविली. शेतकऱ्यांना विहीरीसाठी अनुदान दिले आहे. त्या शेतकऱ्यांनी ठिबक करुन फळबाग मोठ्या प्रमाणात लावावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच यासाठी शासन अनुदान देते असे सांगितले. शेतकऱ्यांनी टाळ्या वाजून या आवाहनाला प्रतिसाद दिला.
औसा येथील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यामतून एकूण 7009 लोकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला. लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जात होतं…त्यातल्या काही बोलक्या प्रतिक्रिया.. दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य शासनाने बालसंगोपन अनुदान सुरु केले असून 1100 रुपये दरमहा मिळणारे अनुदान आता 2200 रुपये मिळत आहे. औसा तालुक्यातील लखनगाव येथील ज्योती विजयकुमार कदम यांना दोन अपत्य असून त्यांना या कार्यक्रमात बाल संगोपन अनुदान मंजुरीचे पत्र देण्यात आले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता , त्या म्हणाल्या, माझ्या परिस्थितीमुळे मी मुलांना फारसं शिकवू शकले नसते पण आता हा आधार माझ्यासाठी मोठा आहे. मी माझ्या लेकरांना शिकवून मोठं करणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
शिवली येथील शेतकरी गोपाळ काळे यांचा शेतीपूरक दूधाचा व्यवसाय आहे, त्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी चाप कट्टर देण्यात आले. यामुळे माझा वेळ वाचणार असून माझ्या व्यवसाय वृद्धीसाठी हे गरजेचे होते, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली.
खरोसा येथील शेतकरी बलभीम बिराजदार यांना ठिबक सिंचन अनुदान मंजूर झाले. यामुळे पिकाला पाणी देणे सुलभ होणार असून पिकाचा उतारा वाढण्यासाठी मदत आणि पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन कमी पाण्यात अधिक भिजवा होणार असल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत… एकूणच ‘शासन आपल्या दारी’ हा अत्यंत चांगला उपक्रम असून जनतेच्या हातात थेट लाभ जात असल्यामुळे मोठं समाधान लोकांमध्ये दिसून आले. येत्या शुक्रवारी, 26 मे रोजी उदगीर येथे तर 27 मे रोजी जळकोट मध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम होणार आहे. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळेल असा प्रशासनाला विश्वास आहे.
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
*****