लातूर दि. 11: ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे’ ही संत तुकाराम महाराजांची तर ‘शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होतसे’ ही समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण सार्थ ठरविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) येथील लाल मातीत दर वर्षी राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती हिंद केसरी दिनानाथ सिंग व विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.
कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच ही राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा या वर्षी मंगळवार, दि. १४ मार्च २०२३ रोजी भव्य स्वरूपात होत आहेत. स्पर्धेतून भविष्यामध्ये हिंद केसरी, महान भारत केसरी, रूस्तम-ए-हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल करणारे मल्ल तयार व्हावे, अशी भावना आहे. आजच्या तरूण पिढीतील मरगळलेल्या मनांना मातीतील कुस्तीचे महत्त्व पटवून देणे, त्यांना प्रोत्साहित करून कुस्तीसाठी उत्तेजित करणे आवश्यक आहे. अशा मरगळलेल्या परिस्थितीत ही कुस्ती स्पर्धा निश्चितच वेगळी दिशा देणारी ठरेल. छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या कुस्ती स्पर्धांच्या वैभवशाली परंपरेला साजेशी अशी ही कुस्ती स्पर्धा आहे.
लातूर येथील रामेश्वर (रुई) तील वायुपूत्र हनुमान शाळेचे उद्घाटन २००७ साली झाले. त्यावेळी हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपतराव आंधळकर, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी चंदगीराम, हिंद केसरी सतपाल, हिंद केसरी दारासिंग आणि रुस्तुम ए हिंद हिरश्चंद्र बिराजदार यांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने ही माती पावन झाली आहे.
देशात प्रथमच १ मे २००९ साली कुस्ती वरील गोलमेज परिषद विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिेषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात भरविण्यात आली होती. या परिषदेला देशातील सर्व हिंद केसरी, भारत केसरी सारखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी उपस्थितांनी कुस्ती स्पर्धेतील भविष्यातील करियर संदर्भात मार्गदर्शन केले होते.
या स्पर्धेचे स्फूर्तीस्थान म्हणजे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे वडील वै. दादाराव कराड हे आहेत. ते अत्यंत धाडसी, प्रभावी, करारी असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नसानसामध्ये राष्ट्र व धर्म अभिमान भिनलेला होता. त्याचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी होते. अशा या महान व्यक्तिमत्वाचे अधिष्ठान या स्पर्धेला लाभले होते. त्यामुळे ही स्पर्धा संस्मरणीय ठरेल. या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर क्रिडाप्रेमींनी हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजकांनी केले आहे.