पिता आणि भावाच्या भुमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महिलांना पाठबळ ः डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर/प्रतिनिधी ः पिता आणि भावाच्या भुमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना पाठबळ दिले आहे. मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महिलांसाठी विविध योजना अंमलात आणल्या असून महिलांना आरक्षण देण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वातील सरकारने केलेले असल्याचे मत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.

महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर शहर महिला मोर्चाची बैठक गिरवलकर मंगल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी डॉ. चाकूरकर बोलत होत्या. मंचावर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, लातूर शहर महिलाध्यक्षा रागिनीताई यादव, शहर सरचिटणीस मीनाताई भोसले, सुप्रियाताई पायाळ, केशरताई श्रृंगारे आदींची उपस्थिती होती.
डॉ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, काँग्रेसच्या कार्यकाळात महिलांना बरोबरीची वागणूक दिली जात नव्हती. महिलांना सन्मान मिळत नव्हता. महिलांच्या विकासासाठी योजना राबविल्या जात नव्हत्या. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात नव्हते उलट त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. भाजपामध्ये महिलांना देवी, माता आणि बहीण म्हणून सन्मानित केेले जाते. ही भाजपाची संस्कृती आहे. त्यामुळे लातूर मतदारसंघातील महिला वर्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला समर्थन देत सर्वांगीण विकासासाठी खा. सुधाकर शृंगारे यांना विजयी करावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. निलंगेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये महिला वर्गासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मातृवंदना योजनेतून महिलांचा सन्मान करण्याचे काम मोदी सरकारने केले असून आगामी काळात देशातील तब्बल 3.5 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. पंतप्रधानांनी महिला वर्गाच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. महिलांमध्ये इतिहास घडविण्याची सक्षमता असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लातूर मतदारसंघातून पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान करून नवा लातूर पॅटर्न घडवावा, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.
बैठकीचे प्रास्ताविक शहर महिला जिल्हाध्यक्षा रागिनी यादव यांनी केले. या बैठकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.