*लातूर महापालिकेची दशकपूर्ती*

0
1046
लातूर महानगरपालिकेची दशकपूर्ती.
महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
सांस्कृतिक, क्रीडा, कार्यालयीन स्पर्धांचे  आयोजन
 बचत गट विक्री प्रदर्शन
लातूर/प्रतिनिधी:दि.२५ ऑक्टोबर रोजी लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस १० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दशकपूर्ती महोत्सव साजरा केला जाणार असून पुढील महिनाभर विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
  २५ ऑक्टोबर २०११ रोजी लातूर शहर महानगरपालिकेची स्थापना झाली.त्यास सोमवार दि.२५  ऑक्टोबर रोजी १० वर्ष पूर्ण होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाटचालीत १० वर्ष हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचा दशकपूर्ती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याच्या नियोजन करिता नागरी समितीचे गठन करण्यात आले आहे.
   सभागृहाने घेतलेल्या निर्णयानुसार दि.२५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दशकपुर्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे.या कालावधीत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.क्रीडा, शैक्षणिक तसेच कार्यालयीन स्पर्धां सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.मनपाच्या मुख्य इमारतीचे सुशोभीकरण केले जाणार आहे.या काळात शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉलही उभे केले जाणार आहेत.
  लातूर शहराला मोठा सांस्कृतिक  इतिहास आहे. मागील १० वर्षाच्या काळात अनेक विकास कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत तसेच अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मनपाच्या दशकपूर्ती महोत्सवानिमित्त त्याला उजाळा दिला जाणार आहे. दशकपूर्ती महोत्सव हा एक अनोखा लातूर पॅटर्न ठरावा अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे.मनपाचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here