लातूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात यावी
भाजपा अध्यक्ष देविदास काळे यांची मागणी
लातूर/प्रतिनिधीः– केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेअंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा भुमिपुजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सोलापूर रेल्वे विभागाचे विवेक होके यांना निविदेन देऊन लातूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केली आहे.

केवळ भारतालाच नव्हे तर संपुर्ण जगाला भुरळ घालणारी वंदे भारत रेल्वे राज्य व देशात विविध ठिकाणी सुरु करण्यात आलेली आहे. लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून या रेल्वेसाठी आवश्यक असणार्या कोचची निर्मिती लवकरच सुरु होणार आहे. मात्र अद्यापर्यंत लातूरला अजूनही या रेल्वेची प्रतिक्षा आहे. ज्या लातूरमधून वंदे भारत रेल्वेसाठी आवश्यक असणारे कोच निर्मिती होतील त्याच लातूरमधून वंदे भारत रेल्वे मुंबईसाठी सुरु व्हावी अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील नागरीकांकडून व्यक्त होत आहे. लातूर रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा भुमिपुजन सोहळा रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या भुमिपुजन सोहळ्यासाठी खा. सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड. लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिलीपराव देशमुख, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, याच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाचे विवेक होके आणि इतर अधिकारी यांचीही यावेळी उपस्थिती होती. या सोहळ्याचे औचित्य साधून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी विवेक होके यांना निविदेनाच्या माध्यमातून लातूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली आहे.
लातूर येथील मुंबईसाठी सध्या एक रेल्वे धावत असली तरी प्रवाश्याची संख्या लक्षात घेता आणखीन कांही रेल्वे मुंबईसाठी सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेत अधिक भर पडणार असल्याचे सांगून देविदास काळे यांनी विशेषतः लातूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरु केल्यास प्रवाशांना अधिक सोय प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळेच प्रवाशांची सोय लक्षात घेऊन वंदे भारत ही रेल्वे लातूर ते मुंबई दरम्यान सुरु केल्यास रेल्वे विभागाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून लातूर रेल्वे स्थानक अधिक आकर्षीत होणार असून यात वंदे भारत सुरु झाल्यास या रेल्वेस्थानकाच्या वैभवात भर पडेल असा विश्वास व्यक्त करून या वंदे भारत रेल्वेसाठी रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर याबाबत खा. सुधाकर शृंगारे यांच्यासह लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही देविदास काळे यांनी दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक तथा मंडल अध्यक्ष रवि सुडे, शहर सरचिटणी अॅड.दिग्विजय काथवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.