39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसांस्कृतिक*लातूर, परभणीतील नाट्यगृहे लवकरच पूर्ण होणार*

*लातूर, परभणीतील नाट्यगृहे लवकरच पूर्ण होणार*

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार
– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
■राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

औरंगाबाद ( वृत्तसेवा ) : महाराष्ट्राला उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने छत्रपती शिवरायांची वाघनखे लवकरच राज्यात दाखल होतील. त्याचबरोबर विकीपिडियाशी सांमजस्य करार करून जगभरातील ३०० भाषेत राज्याच्या सांस्कृतिक वारशांची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ऑनलाइन पोर्टलचाही आधार घेऊन राज्याचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील लातूर, परभणी येथील नाट्यगृहे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तापडिया नाट्य मंदिरात ‘नाट्य गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.


मंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील जीर्ण झालेल्या नाट्यगृहांना नवसंजिवनी देण्याचे काम शासन करत आहे. सांस्कृतिक कार्याचे, विचारांचे अदान-प्रदान व्हावे यासाठी राज्यात नवीन ७५ ठिकाणी तालुका पातळीवर सांस्कृतिक नाट्यगृह उभारण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे नियोजन आहे. संचालनालयाने विविध पुरस्कारांच्या रकमांमध्ये देखील भरीव प्रमाणात वाढ केली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. आगामी काळात महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचावा यासाठी ‘ॲमेझॉन’ या ॲपप्रमाणे सांस्कृतिक पोर्टलची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशासह परदेशात महाराष्ट्राची परंपरा पोहोचविण्याचा सांस्कृतिक संचालनालयाचा मानस आहे. लवकरच जपानमध्येही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.


प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी सांस्कृतिक विभागाकडून उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देणे, राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे आयोजन करणे, नाट्यक्षेत्रासाठी अधिकाधिक भरीव काम करणे, हौशी, व्यावसायिक नाट्यकर्मी, कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संचालनालय पुढाकार घेत असल्याचे श्री. खारगे म्हणाले.


कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांनी स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित केले. प्रहसन, गणेश वंदन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमात रंगत आणली. ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रॉबिनहुड-क्रांतीवीर दत्तोबा भोसले’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. राज्य्भरातील नाट्यस्पर्धेतील विजेते संघ, नाट्यकर्मी, संगीत दिग्दर्शक, नाट्य लेखक, दिग्दर्शक आदींची कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]