17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी !*

*लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी !*

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत लोदगा येथे मिलेटची पेरणी; मिलेटपासून बनलेल्या पदार्थांचाही घेतला आस्वाद

राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा पुढाकार

लातूर, दि. 15 (वृत्तसेवा) : मिलेट अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून मिलेटचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात कृषि विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 200 हेक्टरवर मिलेट पेरणीचे नियोजन करण्यात आले असून श्री. पटेल आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोदगा येथून मिलेट पेरणीला सुरुवात करण्यात आली. तसेच बचत गटांच्या महिलांनी मिलेटपासून तयार केलेल्या पदार्थांचाही यावेळी त्यांनी आस्वाद घेतला.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, औसा- रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भारत सूर्यवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव, डॉ. शेषेराव मोहिते यांच्यासह मिलेट पेरणी करणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना बांबूपासून बनविले पेन, टूथब्रश आणि टॉवेल देवून सत्कार करण्यात आला. लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिलेट पेरणीसाठी सहमती दर्शविली आहे.

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश करणे आवश्यक आहे. तृणधान्यात कॅल्शिअम, लोह आणि प्रथिने याचे उच्च प्रमाण असून कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबरचा समावेश आहे. तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासोबतच जिल्ह्यात मिलेट लागवडीला प्रोत्साहन देण्यासोबतच उत्पादित झालेल्या मिलेटला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना मिलेटचे चांगल्या प्रतीचे बियाणे लोदगा येथील फिनिक्स फौंडेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. मिलेट पिकांसाठी कमी पाणी लागते, तसेच 80 ते 90 दिवसांत ही पिके घेतली जातात. लातूर जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिलेट लागवड फायदेशीर ठरणार असल्याचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

मिलेटचा आहारातील समावेश ही काळाची गरज असून मिलेट हे आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, राळे आदी मिलेटची पेरणी जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर होण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर- घुगे यांनी सांगितले. तसेच मिलेटपासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यदायी असल्याने बचतगटांच्या माध्यमातून अशा पदार्थांची विक्री वाढविण्यासाठी जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषि विभागामार्फत प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पोषणाच्या दृष्टीने मिलेट आहे फायदेशीर

मिलेट पोषणाच्या दृष्टिकोनातून भातापेक्षा अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये अधिक कॅलोरी, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि थायमिन (बी1) असतात. त्यामुळे, मिलेटचा समावेश आहारात केल्यास अनेक पोषणतत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात, ज्यामुळे एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

मिलेटचे असे आहे पोषणमूल्य

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन ए, बी व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]