आमदार संभाजी पाटील निलंगेकर
नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री महाजन यांचे निर्देश
लातूर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये विजेचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. शेतीसह घरगुती विद्यूत पुरवठा ट्रान्स्फार्मरअभावी खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून वारंवार होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यासाठी आवश्यक असणारे ट्रान्स्फार्मर व दुरूस्तीसाठी ऑईलची उपलब्धी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीस पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मकता दर्शवत आगामी 48 तासात ट्रान्स्फार्मरसह ऑईलचा प्रश्न सुटून वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे ऑनलाईन पध्दतीने पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सहभागी झालेले माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील वीज प्रश्नाबाबत असलेली समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पालकमंत्री महाजन यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतीसह घरगुती विद्यूत पुरवठा खंडित होवू नये यासाठी महावितरण विभागाने योग्य ती दक्षता घेवून आगामी 48 तासात विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत सहभागी झालेले माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या वतीने निधीचे पुर्ननियोजन करीत असताना प्राथमिक शाळा दुरूस्ती, आवश्यक ठिकाणी बांधकाम, त्याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचबरोबर विद्युत विभागासह जलसंधारणासाठी निधीला प्राधान्य देवून पुर्ननियोजनात इतर कामे घेवू नये, अशी सूचना केली.
या सुचनेबाबत पालकमंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून आगामी काळात नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी पुर्णपणे खर्च करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर निधीचे नियोजन करीत असताना शिक्षण, आरोग्य यासह शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा विशेष विचार होवून त्याकरिता निधीची तरतूद करण्याचेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून शाळा दुरूस्तीसह खोली बांधकाम यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यात येईल, असे सांगून विशेषतः शाळेमध्ये शौचालय उभारणीस प्राधान्य देण्यात येवून तात्काळ त्या कामाला गती देण्याचेही निर्देश दिलेले आहेत.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुचविल्याप्रमाणे विजेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीच्या मध्यमातून ट्रान्स्फार्मर खरेदी करण्यास मंजूरी देवून ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे ऑईलही तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनादिलेल्या आहेत. जेणेकरून शेतीसह घरगुती विद्यूत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या बैठकीत आ. निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना सुरू केल्याबद्दल या सरकारचे अभिनंदन करून या अभियानाच्या माध्यमातून अधिकची कामे गतीने होण्यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली. याबाबत पालकमंत्री महाजन यांनी जलयुक्त शिवार ही लोकाभिमूख योजना असून लोकांच्या हितासाठी या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक कामे करण्यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासह जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यास निर्देश दिल्याबद्दल पालकमंत्री महाजन यांचे आ. निलंगेकर यांनी आभार मानले आहेत.