पाणी टंचाई उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढा
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा आढावा
- गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्याच्या सूचना
- वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश
लातूर, दि. 24 (वृत्तसेवा ) : पाणी टंचाई निवारण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव तीन दिवसांच्या आत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पाणी टंचाई निवारण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या उपाययोजनांची गतिमान अंमलबजावणी होण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांना विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत येणाऱ्या प्रस्तावांची पडताळणी करून हे प्रस्ताव तीन दिवसांत निकाली काढणे आवश्यक आहे. तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी क्षेत्रीय पाहणी करून नियमितपणे पाणी टंचाईचा आढावा घ्यावा. दर आठवड्याला प्रत्येक उपविभागीय महसूल अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पाणी टंचाई आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
सिंचन प्रकल्पातील गाळ उपशासाठी ‘मिशन मोड’वर काम करावे
सध्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असल्याने या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृद व जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. उपविभागीय महसूल अधिकारी यांनी सातत्याने आढावा घेवून आवश्यक कार्यवाही करावी. येत्या आठवड्यात प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांनी व्यापक स्वरुपात ही मोहीम राबवून अधिकाधिक गाळ उपसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
‘माझा जिल्हा, हरित जिल्हा’ उपक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करावे
येत्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून वृक्ष लागवडीसाठी स्थळ निश्चिती, रोपांची निवड करावी. शिक्षण विभागानेही यामध्ये पुढाकार घेवून शाळानिहाय वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करावे. गाळ उपसा करण्यात येणाऱ्या प्रत्येक सिंचन प्रकल्पाच्या परिसरात संबंधित विभाग, स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच प्रत्येक तालुक्यात टेकडी, डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले.
विहीर पुनर्भरण, रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंगसाठी विशेष प्रयत्न करावेत
आगामी काळात पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी भूजल पुनर्भरणासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. विशेषतः विहीर पुनर्भरण, रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातही भूजल पुनर्भरणासाठी क्लस्टर स्वरुपात मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. कृषि विभागाने प्रत्येक तालुक्यामध्ये विहीर पुनर्भरण उपक्रमासाठी व्यापक स्वरुपात कामे हाती घ्यावीत. या कामांचा दर आठवड्याला आढावा घेवून त्याबाबत अवगत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे
जिल्ह्यात जल जीवन मिशनची काही कामे संथगतीने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. या कामांना गती देण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या कामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींवर सोलर पंप बसविण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.