‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप’ला तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग; तालुक्यातून प्रथम कोण येणार याचीउत्सुकता—
लातूर : आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ ही भव्य स्पर्धा आयोजिण्यात आली असून यात जिल्ह्यातील सुमारे ४०० संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा उत्साही वातावरणात जिल्ह्यात सुरू झाली असून तालुकास्तरावर आता कोण बाजी मारणार, याची उत्सुकता तरुणाईमध्ये दिसून येत आहे.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप संयोजन समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची शुक्रवारपासून (ता. १३) जिल्ह्यात मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. सर्व तालुक्यातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आजवर सुमारे ४०० संघांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे ६ हजारहून अधिक तरुण या स्पर्धेत खेळणार आहेत. तालुकास्तरावरील या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धेत आत्तापासूनच चुरस पहायला मिळत आहे.

तालुकास्तरावर सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास 51 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 31 हजार रुपयांचे दिले जाणार आहे. शिवाय, मालिकावीर (5,000 रुपये), उत्कृष्ट फलंदाज (3,100 रुपये) व उत्कृष्ट गोलंदाज (3,100 रुपये) अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यानंतर जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेत प्रथम आलेल्या संघास 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. द्वितीय पारितोषिक हे 51 हजार तर तृतीय पारितोषिक 31 हजार रुपयांचे दिले जाणार आहे. यासोबतच मालिकावीर (3,100 रुपये), उत्कृष्ट फलंदाज (2,100 रुपये), उत्कृष्ट गोलंदाज (2,100 रुपये) अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.—-क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नशील- आमदार धिरज देशमुख
हल्ली विद्यार्थ्यांचा, पालकांचा क्रीडा क्षेत्राकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुन्हा एकदा क्रीडा संस्कृती वाढताना दिसत आहे. म्हणून आपल्या भागातील खेळाडूंसाठीही अधिक पोषक वातावरण निर्माण झाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ ही स्पर्धा आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे तरुणांचे मैदानी खेळावरील प्रेम अधोरेखित होते. या स्पर्धेतून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील. अशा प्रयत्नांतून लातूरमध्ये क्रीडा संस्कृती आणखी वाढेल, याचा मला विश्वास आहे, अशी भावना आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.—-