लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना; दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ
लातूर : अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाणारे आजाराचे निदान सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. याचा विचार करून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने आणि लातूरमधील डॉक्टरांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना’ ही नाविन्यपूर्ण सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबाला आता आरोग्य कवच मिळाले आहे.

लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे व स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ‘लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजने’चा शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संचालक श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक राजकुमार पाटील, एन. आर. पाटील, अनुप शेळके, संचालिका स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सर्जेराव मोरे, संभाजी सूळ, श्याम भोसले, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. आनंद पाटील, डॉ. रविकिरण भातांब्रे, डॉ. श्वेता भातांब्रे, डॉ. मेहूल राठोड, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. आनंद गोरे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. उमेश कानडे, डॉ. प्रमोद घुगे, डाॅ. निखील काळे, डाॅ. चंद्रशेखर हाळणीकर, डाॅ. विशाल मैंदरकर, डाॅ. अभय कदम, डाॅ. अनिल कोल्हे, डाॅ. हर्षदा चोपडे, डाॅ. दत्तात्रय गिरजी, डाॅ. अश्विनी नारायणकर, डाॅ. अजय नारायणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजवर जिल्हा बँकेने शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतले. तसाच विचार हे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही जिल्हा बँकेने वेळोवेळी केला. यातूनच ही आरोग्य सुरक्षा योजना आकाराला आली. यात ५५ हून अधिक डॉक्टर व रुग्णालय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून ते या योजनेतील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना माफक व सवलतीच्या दरात सेवा देणार आहेत. याबद्दल श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी डॉक्टरांचे आभार मानले. डॉ. अशोक पोद्दार यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून ही योजना सर्व डॉक्टर योग्य पद्धतीने यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला.
योजनेचे लवकरच विस्तारीकरण होणार
सेवाभाव वृती जपणाऱ्या शहरातील डॉक्टरांच्या सहकार्याने सुरू झालेल्या लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजनेचे सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी यावेळी कौतुक केले. बदलत्या जीवनशैलीमुळे व आजच्या स्पर्धेच्या काळात आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक असून लवकरच या योजनेचे विस्तारीकरण करून मांजरा परिवारातील साखर कारखाने व इतर संस्था यांनाही त्याच्या कक्षेत आणले जाईल, असे प्रतिपादन श्री. दिलीपराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. या योजनेची कार्यपद्धती पेपरलेस असेल, असेही ते म्हणाले.