दिव्यांग मुलांसाठी सुरु केलेल्या उमंग ऑटिझम सेंटरला ‘स्कॉच अवॉर्ड’
नवी दिल्ली( माध्यम वृत्तसेवा):–, दि. २९ : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या उमंग ऑटिझम अँड मल्टीडीसिबिलिटी रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे डॉ. प्रशांत उटगे यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
‘स्कॉच अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठीचार टप्प्यात झालेल्या मूल्यांकनात प्रथमत: ज्यूरी मूल्याकंनामध्ये व्हिडिओ, पीपीटी, छायाचित्रे आणि केस स्टडीमार्फत मूल्यांकन झाले. त्यानंतर मतदानाची पहिली फेरी आणि निवड विश्लेषकांमार्फत करण्यात आले. निवड केलेले प्रकल्प तज्ज्ञांकडून तपासून मूल्यांकन आणि मुलाखतीद्वारे पुढे पाठविण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांची मते मागविली. तिसऱ्या टप्प्यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी प्रदर्शन आणि थेट मतदानाद्वारे प्रकल्पाची निवड केली. चतुर्थ आणि अंतिम टप्प्यात ऑनलाईन प्रदशर्नामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे प्रकल्पाविषयी माहितीचे सादरीकरण केले. त्यानुसार देशभरातील तज्ज्ञांनी उमंग ऑटिझम सेंटर या प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड केली.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे शासकीय वसाहतीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उमंग ऑटिझम सेंटर अँड मल्टीडिसिबिलिटी रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या उपक्रमास निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचबरोबर विविध खाजगी संस्था कंपन्या यांनी सीएसआरच्या माध्यमातून हे केंद्र उभारणीस मदत केली आहे.
या ठिकाणी ऑटिझम (स्वमग्नता), बहुविकलांगता, सेरेब्रल पाल्सी, बुध्यांक मापन, अति चंचलपणा, या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी विविध अद्यावत व सुसज्ज उपचार पद्धती उपलब्ध असून त्यात मानसिक व शारिरीक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या न्युरोलॉजीकल ट्रीटमेंट, अर्ली ईन्टरवेन्शन, ऑक्युपेशनल थेरपी, फिजोओथेरपी, स्पीच थेरपी, बिव्हेवीरल थेरपी, रिमेडिअल थेरपी, सायकोलॉजीकल थेरपी, सेन्सरी ईन्टीग्रेशन थेरपी, स्पेशल एज्युकेशन, ह्यॅड्रो थेरपी आणि त्यासोबतच विविध वैद्यकीय तपासणीची सुविधा यांचा समावेश आहे.
उमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत ऑक्युपेशनल थेरपी, फिजोओथेरपी, स्पीच थेरपी, बिव्हेवीरल थेरपी, रिमेडिअल थेरपी, सायकोलॉजीकल थेरपी, सेन्सरी ईन्टीग्रेशन थेरपी, यांच्या मदतीने जवळपास ७ हजार ९३६ दिव्यांग मुलांवर उपचार करण्यात आले आहेत.
अशा प्रकारचे ऑटिझम सेंटर केवळ मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असून येथील उपचारपद्धती अतिशय महागड्या असतात. परंतु, उमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून लातूरसारख्या शहरात या सर्व उपचार पद्धती अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’मध्ये स्थापन झालेले केंद्र अत्यंत उत्कृष्टपणे कार्यरत आहे. या कार्याची दखल घेवून या केंद्राचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे.
‘उमंग’शी संबंधित सर्वांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
उमंग ऑटिझम सेंटरला राष्ट्रीय स्तरावरचा ‘स्कॉच अवार्ड’ मिळाला असून जिल्हा प्रशासन, सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी सुरु असलेल्या कामाची ही पावती आहे. जास्तीत जास्त दिव्यांग मुलांवर उपचार व्हावेत, त्यांच्यातील दिव्यांगत्वाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी ‘ऑटिझम सेंटर ऑन व्हिल’ ही संकल्पना राबविली जात आहे. या पुरस्कारामुळे दिव्यांग मुलांसाठी अधिक जोमाने काम करून जास्तीत जास्त मुलांवर उपचार होण्यासाठी उमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. या सेंटरशी जोडले गेलेल्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आहे, असे मत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले.