38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसांस्कृतिक*लातूर जिल्हावासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !*

*लातूर जिल्हावासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !*

भव्य महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन अंतर्गत आजपासून विविध कार्यक्रम

▪️दिग्गज कलाकारांचा सहभाग; नाट्य, गीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लातूर, दि. 10 वृत्तसेवा: राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भव्य महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने 100 व्या नाट्य संमेलनाचे लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये नाट्य, कला आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे. 11 फेब्रुवारी 2024 पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार असून मुख्य उद्घाटन कार्यक्रम 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महोत्सवात आयोजित सर्व कार्यक्रमांना जिल्हावासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शैलेश गोजमगुंडे यांनी केले आहे.

दयानंद महाविद्यालय मैदान, दयानंद सभागृह आणि मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनातील कार्यक्रम होणार आहेत. या महासंस्कृती महोत्सवामध्ये 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत दयानंद महाविद्यालय मैदान येथे शिवकालीन छायाचित्र आणि शस्त्र प्रदर्शन, स्थानिक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थांची दालने उभारण्यात येणार आहेत.

11 फेब्रुवारीला पूर्वरंग कार्यक्रमात नाटक, हास्यधारा, गझलसंध्याचे आयोजन

महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन अंतर्गत 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दगडोजीराव देशमुख साभृहात ‘बोक्या सातबंडे’ हे व्यावसायिक बालनाट्य होणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता ‘बालनाट्य चर्चासत्र व नाट्यछटा’ हा प्रकाश पारखी यांचा कार्यक्रम होईल. याच ठिकाणी सायंकाळी 7 वाजता ‘अर्ध्याच्या शोधात दोन’ हे नाटक होणार आहे. दयानंद सभागृह येथे 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ‘हास्यधारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे हे करणार आहेत. तसेच नितीन देशमुख, प्रशांत मोरे, भरत दौंडकर, अरुण पवार, आबा पाटील, इंद्रजीत घुले, गुंजन पाटील यांचा सहभाग राहील. रात्री 8 वाजता सुप्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांचा ‘गझलसंध्या’ कार्यक्रम होईल.

12 फेब्रुवारीला नाट्यदिंडी, तू तू मी मी आणि कृष्ण विवर नाटके सादर होणार

सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गंजगोलाई ते दयानंद महाविद्यालयापर्यंत नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, भरत जाधव, संकर्षण करडे, विजय गोखले, अभिनेत्री स्पृहा जोशी सहभागी होणार आहेत. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम होईल. याचठिकाणी रात्री 8 वाजता ‘तू तू मी मी’ हे व्यावसायिक नाटक सादर होईल. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव हे 14 भूमिकेत असतील, तसेच कमलाकर सातपुते यांचाही सहभाग असेल. दगडोजीराव देशमुख सभागृह येथे रात्री 8 वाजता अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘कृष्ण विवर’ हे प्रायोगिक नाटक सादर होईल.

13 फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा, सुगम गायन, लोककला जागर आणि नाटकांचे सादरीकरण

महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा 13 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता दयानंद सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर याच सभागृहात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा सुगम गायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4 वाजता ‘सिनेमातील नाटक’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये गजेंद्र आहिरे, ज्येष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील, निर्माता चंद्रशेखर सांडवे, पत्रकार अश्विनी धायगुडे यांचा सहभाग राहील. सायंकाळी 6.30 वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने ‘मुंगी उडाली आकाशी’ हे नाट्य अभिवाचन सादर होणार आहे. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता स्थानिक कलावंतांचा ‘लोककला जागर’ हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये भूपाळी, गण, गवळण, अभंग, भारुड, पोवाडा, वगनाट्य कार्यक्रमाचा यामध्ये समावेश आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ रंगकर्मींचा अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. रात्री 8 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामावरील ‘गाथा मुक्तिसंग्रामाची’ हे भव्य नाटक होईल. दगडोजीराव देशमुख सभागृहात रात्री 8 वाजता ‘नेकी’ हे प्रायोगिक नाटक सादर होईल.

14 फेब्रुवारीला वऱ्हाड निघालय लंडनला, महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ, परिसंवाद

महोत्सवामध्ये 14 फेब्रुवारीला दयानंद महाविद्यालय मैदानावर सकाळी 11 वाजता अभिनेते संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ हे व्यावसायिक नाटक आयोजित करण्यात आले आहे. तसेच दुपारी 2 वाजता ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ हा परिसंवाद होणार असून यामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पत्रकार विलास बडे यांचा सहभाग राहील. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी निवेदन करतील. सायंकाळी 5 वाजता संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उपस्थितीत संमेलन हस्तांतरण सोहळा होईल. सायंकाळी 6 वाजता शाहीर तुकाराम सुवर्णकार व संच शिवगीते व पोवाडा सादर करतील. सायंकाळी 7 वाजता ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांचा सहभाग राहील.
दयानंद सभागृहात 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक कलाकारांचा नाट्यगीत महोत्सव आणि दुपारी 2 वाजता नाट्यवाचन महोत्सव कार्यक्रम होईल. तसेच दगडोजीराव देशमुख सभागृहात रात्री 8 वाजता ‘साखरेचे पाच दाणे’ हे स्थानिक नाटक सादर होईल.

15 फेब्रुवारीला मुक्काम पोस्ट आडगाव, महेश काळेंचे सुगम गायन

15 फेब्रुवारी रोजी दगडोजीराव देशमुख सभागृह येथे सकाळी 10 वाजता स्थानिक कलाकारांचा एकांकिका आणि एकपात्री महोत्सव होईल. रात्री 8 वाजता ‘बॅरिस्टर’ हे स्थानिक नाटक सादर होईल. दयानंद सभागृह येथे सकाळी 10 वाजता स्थानिक कलाकारांचा बालनाट्य, नाट्यछटा कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी 6 वाजता पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे व्यावसायिक नाटक सादर होईल. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुगम गायन कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

लातूरच्या वेळ अमावास्येचे वैशिष्ट्य अधोरेखित होणार

लातूर जिल्ह्यात वेळ अमावास्येला विशेष महत्व आहे. यादिवशी शेतामध्ये केली जाणारी पूजा, त्यानिमित्ताने तयार करण्यात येणार खाद्यपदार्थ यामधून लातूरच्या संस्कृतीचे दर्शन घडते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून महासंस्कृती महोत्सवामध्ये लातूर जिल्ह्यातील वेळ अमावस्येचे दर्शन घडविणारे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार असून यानिमित्ताने लातूरच्या संस्कृतीची ओळख बाहेरून येणाऱ्या कलावंत, रसिकांना होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]