कार्यकारी मंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सुरेश पेन्सलवार यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधीः-
समाज बांधवाच्या अडीअडचणी सोडविण्यासह समाजाचे संघटन व्हावे याकरीता लातूर आर्य वैश्य महासभा सातत्याने पुढाकार घेत असल्याचे पाहण्यास मिळते. त्याचबरोबर लातूर आर्य वैश्य महासभेने ऑनलाईन वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करून एक वेगळा लातूर पॅटर्न निर्माण केलेला आहे. त्यामुळे लातूर आर्य वैश्य महासभेचे कार्य आदर्शदायी असल्याचे गौरव उद्गार माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने जिल्हा कार्यकारणी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. यावेळी अधिवेशनचे अध्यक्ष या नात्याने माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आ. समीर कुणावार, आंध्रप्रदेश पर्यावरण व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर गुब्बा, काशी अन्नपुर्णा नित्यान्न सत्रमचे सचिव बच्चु गुप्ते यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष नंदकुमार गादेवार महासचिव गोविंद बिडवई कोशाध्यक्ष सुभाष कन्नावार संघटन प्रमुख प्रदिप कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर आर्य वैश्य महासभेने आदर्शदायी कार्य केल्याने व रक्तदान कार्यात पण 181 जणांकडून रक्तदान करून घेतल्या बद्दल लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पेन्सलवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून समाजबांधवाचे प्रश्न सुटून त्यांच्या अडीअडचणीत मदत व्हावी हा मुख्य हेतू असल्याचे सांगत माजी मंत्री आ. मुनगंटीवार म्हणाले की, काळाप्रमाणे आता समाजबांधवानी आपल्यामध्ये बदल घडविण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाने सर्वांनाच मानवतेचा धर्म कसा असावा ही शिकवण दिलेली असून लातूर आर्य वैश्य महासभेने कोरोना काळात केलेले कार्य विशेष असल्याचे सांगितले. याच काळात लातूर आर्य वैश्य महासभेने ऑनलाईन पद्धतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जवळपास 800 जणांनी सहभाग नोंदविला असून 22 विवाह या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चित झाल्याने हा मेळावा राज्यासाठी आदर्शदायी ठरल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. कोरोना काळातच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून राज्यभरातून 1854 जणांनी तर लातूर जिल्ह्यातून 181 जणांनी रक्तदान केल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे लातूर आर्य वैश्य महासभेच्या वतीने जिल्ह्यातील समाज गणना व्हावी यासाठी गोलाई अॅप सुरु केली असून याप्रकारचे अॅप राज्यातील इतर जिल्ह्यांनी सुरु करावे अशा अपेक्षा माजी मंत्री आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
समाजातील नवीन उद्योजकांना बळ देत त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनेतून कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी महासभेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला तिरुपती येथे एक एक्कर जागा प्राप्त झाली असून लवकरच या ठिकाणी भक्त निवास उभा करण्याचे काम सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आगामी काळात महासभेच्या वतीने समाजप्रबोधनासह आरोग्याचे प्रबोधनही करावे असे आवाहन करून प्रत्येकांनी आपला आरोग्यविमा काढणे अपेक्षीत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
लातूर आर्य वैश्य महासभेने केलेल्या आदर्शदायी कार्याबद्दल महासभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पेन्सलवार यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या अधिवेशनासाठी महासभेच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा माधुरी कोले, राज्य महिला अध्यक्षा सौ. सुलभा वट्टमवार यांच्यासह लातूर जिल्हा सचिव संतोष कोटलवार, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अंजली कोटलवार व जिल्ह्यातील जवळपास 45 कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. आगामी अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.