लातूर; दि.८( वृत्तसेवा )-लातूरातील ज्येष्ठ नागरिक संघ आणि विविध महिला संघांनी एकत्र येऊन आगळ्या- वेगळ्या पद्धतीने आणि हटके जागतिक महिला दिन साजरा करून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या हटके कार्यक्रमाची लातूरकर मुक्तकंठाने प्रशंसा करीत आहेत.
निमित्त होते जागतिक महिला दिनाचे …! ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून देशभर सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा केला जातो .यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार केले जातात… त्यांचे गोडवे गायले जातात … ! परंतु या सर्वाला फाटा देऊन लातूरातील सामाजिक कार्यकर्त्या ,ममता हॉस्पिटल मधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आणि फेसस्कॉम महिला समिती प्रमुख डॉ. मायाताई कुलकर्णी यांच्या डोक्यात काहीतरी आगळे- वेगळे ,हटके करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार रचना करण्यात आली आणि जागतिक महिला दिन हटके पद्धतीने साजरा करण्यात आला.
खोरी गल्ली भागातील वेद प्रतिष्ठानच्या सभागृहात महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .व्यासपीठावर प्रमुख वक्त्यापासून ,अध्यक्ष महिलाच होत्या .सूत्रसंचालन करणाऱ्याही महिलाच होत्या. फक्त ज्येष्ठ नागरिक संघाचे तीन पुरुष पदाधिकारी मात्र अपवादाने व्यासपीठावर दिसून आले. महिलांनी महिलांसाठी एकत्र येऊन साजरा केलेल्या या हटके कार्यक्रमाची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा उचित सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांसाठी बौद्धिक मेजवानीही ठेवण्यात आली होती ; आणि महाशिवरात्रीनिमित्त ममता हॉस्पिटलच्या वतीने फराळाची व्यवस्थापन पण करण्यात आली होती. डॉ. अनुजा कुलकर्णी( वैद्यकीय ),नलिनी गावडे (पोलीस दल ),ज्योती कुमठेकर (अभियांत्रिकी) ,हेमलता वैद्य( शिक्षण ) या महिलांचा यावेळी प्रशस्तीपत्र ,शाल ,फेटा ,पुष्पहार घालून उचित सन्मान करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे .त्यांचाही महिलांनी सत्कार केला.
लातूर मनपाच्या सहाय्यक उपायुक्त मंजुषा गुरमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून दयानंद कला महाविद्यालयातील प्राध्यापिका शैलजा दामरे या होत्या .त्यांनी ‘ वैदिक ते आधुनिक काळातील स्त्रीशक्तीची वाटचाल ‘ या विषयावर उद्बोधन करून उपस्थितांची मने जिंकली .आपल्या 40 मिनिटाच्या व्याख्यानात प्रा. दामरे यांनी आधुनिक काळातील स्त्री किती असुरक्षित ,अबला ,दुबळ्या ,कमकुवत आहेत हे सांगत जोपर्यंत आपण मातृशक्तीचा उचित सन्मान करणार नाही; तोपर्यंत मातृशक्तीचे कितीही गोडवे गायले तर ते उचित ठरणार नाही, असे आवर्जून नमूद केले.
व्यासपीठावर फेसकॉम महिला समिती प्रमुख डॉ. मायाताई कुलकर्णी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी जोशी, सचिव प्रकाश घादगिने, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बी .आर .पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मायाताई कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी ‘ खरा तो एकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे ‘ हे प्रार्थना गीत म्हटले गेले .ज्योती मंगलगे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. पोलीस दलातील दिलीप लोभे यांनी महिला दिनाचे स्वरचित काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा शिंदे ,सुनिता बोरगावकर यांनी केले. पसायदान नंतर कार्यक्रमाचे सांगता झाली.