भारताच्या गानकोकिळा म्हणून जनमाणसांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि अजन्म अविवाहित राहून सप्तसूरांना जीवन समर्पित केलेल्या भारतरत्न सुश्री लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. यानिमित्ताने लतादीदींचा लातूरकरांशी असलेला स्नेहसंबंध, आठवणी यांना उजाळा देणारा देणारा हा श्रद्धांजलीपर लेख…..
"मोगरा फुलला, मोगरा फुलला,
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला…. “
हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तेरणेच्या तीरावर असलेल्या औराद शहाजनी या गावी सुमारे चार दशकांपूर्वी दि. ४ डिसें. १९७६ साली दस्तूरखुद्द लतादीदींनी वाद्यवृंद नसताना गायिलेले सुरेल गाणे अजूनही लातूर जिल्हा वासियांनी हृदयाच्या कप्प्यात कायम आहे हे मात्र खरे!
निमित्त होते औराद शहाजनी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या वास्तूच्या उद्घघाटनाचे. १९७० च्या दशकात या परिसरात शिक्षणाची थोडीबहुत रेलचेल सुरू झालेली होती.लातूर आणखी जिल्हा झालेला नव्हता .याच काळात लातूर येथे राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्थापना होत असतानाच औराद शहाजनी सारख्या छोटेखानी गावी तेथील काही सुखवस्तु व्यापारी मंडळींनी शारदोपासक शिक्षण मंडळाची स्थापना केली.

दि 2 फेब्रुवारी 1981
त्याकाळी सबंध भारतवासीयांच्या हृदयावर आपल्या सप्तसुरांनीही अधिराज्य करणाऱ्या लतादीदींच्या वडिलांचे अर्थात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे नाव महाविद्यालयाला देण्याचा विचार पुढे आला आणि संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै. मुकुंददासजी बियाणी, सचिव विश्वनाथ गोलांडे गुरुजी, संचालक कै. किशनलाल शर्मा,कै.दौलतगिर महाराज कै. गुरुपद येरटे, कै. बसवराज गस्तगार ,कै.व्यंकोबा डोईजोडे, कै. दादाराव बगदूरे ,कै.गोविंदलाल चांडक, कै. पंचाप्पा स्वामी, कै. पांडुरंग पाटील, कै.रामनिवास दरक कै. लक्ष्मीनारायण व्यास, कै. पाशा पटेल, कै. श्रीकिशन बियाणी,कै.लक्ष्मणराव भंडारे व कै. अल्लबक्ष लष्करे यांनी भालजी पेंढारकर व ग.दी.माडगूळकर यांच्या माध्यमातून पुणे व कोल्हापूर येथे जाऊन सुश्री लतादीदींची भेट घेतली आणि हे महाविद्यालय लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सुरू करण्यासाठीची परवानगी घेतली.

शुभहस्ते- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण
त्यानुसार दि. १० डिसें. १९७० साली लतादीदींच्या मातोश्री माई मंगेशकर यांच्या हस्ते आणि ग.दी.माडगूळकर हृदयनाथ उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीमध्ये या महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ संपन्न झाला आणि या भागात शैक्षणिक पर्वाची सुरुवात झाली .
पुढे दि.४ डिसें.१९७६ रोजी दस्तुरखुद्द लतादीदींच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण, उषा मंगेशकर, तत्कालीन राज्यमंत्री संग्राम माकणीकर, डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे तत्कालीन आमदार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत या महाविद्यालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होत होता.

.
यावेळी लतादीदींची निवासाची व्यवस्था औराद शहाजनी येथील हेडाभवन येथे करण्यात आली होती. यावेळी दीदींना पाहण्यासाठी आणि त्यांचा सूर ऐकण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे सव्वा लाख लोकांनी औरादच्या भूमीमध्ये हजेरी लावली होती. औरादकरांच्या जीवनातील हा सोनेरी दिवस होता. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य सदाविजय आर्य यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि अचानकपणे पावसाने हजेरी लावली.लाखोंचा जनसमुदाय पसरू नये या उद्देश्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्राचार्य सदाविजय आर्य यांनी लतादीदींची परवानगी न घेताच , “हा पाऊस स्वर्गलोकातून लता मंगेशकर यांचे स्वागत करायला पाठवला आहे.जागेवरून कोणीही उठू नये.लता मंगेशकर यांचे गाणे आपल्याला ऐकायचे नाही का ?” असे भाष्य केले.यावर लोकांनीही एकच गलका केला आणि गाणं म्हणणार नाही असं म्हणून आमंत्रण स्वीकारलेल्या लतादीदींनी त्यांच्या भाषणाच्या वेळी कसल्याही प्रकारचे संगीत वाद्याची साथ नसताना संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतील “मोगरा फुलला…. ” या सुमधुर गीतांनी औरादचा परिसर मंत्रमुग्ध केला. अहो, शेकडो मैलांचा प्रवास करून या भूमीत आलेल्या सप्तसुरांच्या या कन्येचे, लाखो लोकांचे मन तोडून गाणे न गाता जाणे हे नियतीला तरी मान्य झाले असते का ?अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द सदाविजय आर्य यांनी माझ्याजवळ व्यक्त केली. यावेळी स्व. विलासरावजी देशमुख यांनीही पावसात उभे राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला होता असे समजते. परंतु त्यावेळी विलासरावजी आमदार नव्हते.

मास्टर दीनानाथ मंगेशकर हे पदवी अभ्यासक्रमात चार संगीत विषय शिकविणारे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले. या महाविद्यालयाच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून लतादीदींनी महाविद्यालयात विनामूल्य गायनाचा कार्यक्रम देण्याचे मान्य केले.
त्यानूसार औराद येथे दि.२८ फेब्रु.१९८१ रोजी संगीत रजनीचा कार्यक्रम ठरला. आणि दुसऱ्यांदा औराद शहाजानी येथे दीदी मुक्कामी आल्या. यावेळी दीदींची राहण्याची व्यवस्था ही महाविद्यालयाच्या आवारातच दोन खोल्या बांधून करण्यात आली होती.त्याकाळी शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था नव्हती. जगाच्या पाठीवर लौंकिकार्थ येत असलेल्या या स्वरसम्राज्ञीचे या ग्रामीण भागातील कसलीही सुविधा नसलेल्या महाविद्यालयाच्या एका खोलीत रहाणे हे या ग्रामीण भागाविषयी असलेल्या नितांत प्रेमाचे आणि सादगीचे परमोच्च उदाहरण आहे असेच म्हणावे लागेल.
यावेळी दीदींनी औराद शहरात फेरफटका मारला असताऔरादकरांनी दारात रांगोळ्या घालून केलेले स्वागत व भोजनात दिलेली औरादची जिलेबी ही आजन्म दीदींच्या स्मरणात राहिली. शंकरराव चव्हाणही वेळोवेळी याची आठवण काढत.

महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खुल्या शेतामध्ये रात्री आठ वाजता ‘लता मंगेशकर रजनीचा’ हा कार्यक्रम ठेवण्यात आला. खुल्या मैदानात, खुल्या मंचावर लता दीदींच्या आयुष्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता हे विशेष! यानंतरही भविष्यात असा कार्यक्रम कुठे झाल्याचे ऐकिवात नाही.
या कार्यक्रमास उषा मंगेशकर, नितीन मुकेश ,सुरेश वाडकर,विनय मांडके आणि निवेदक म्हणून हरीश भिमानी हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम मास्टर दीनानाथ मंगेशकर कॉलेजच्या सहाय्यार्थ ठेवला असल्याकारणाने त्याकाळी अनुक्रमे शंभर आणि पन्नास रुपयांची तिकीट खरेदी करुन लाखांवर लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते असेही आर्य सरांकडून समजले. कदाचित एवढी तिकीटे खरेदी करून अशा ग्रामीण भागामध्ये सुरांची मैफल ऐकण्यासाठी एवढा रसिकवर्ग आजतागायतही जमल्याचे उदाहरण ऐकिवात नाही.
असे हृदयस्पर्शी लातूरकरांची जुळलेले लतासूर…पिढ्यान् पिढ्या लातूरकरांच्या अभिमानाचा विषय ठरतील …. शेवटी स्वरसम्राज्ञी लता दीदींविषयी माझ्या सारख्या चाहत्यांला एकच प्रश्न पडतो की…
” तुझको खुदा कहूॅं ?
या खुदा को खुदा कहूॅं ?
दोनों की सूरत एक जैसी है,
मै किसको खुदा कहूॅं ?”

विवेक सौताडेकर
साहित्यिक तथा इतिहास संशोधक, लातूर
मो. ९४०३१०१७५१