आमदार धिरज देशमुख यांच्या मागणीची दखल; राज्य सरकारने दिली मान्यता
लातूर : लातूर जिल्ह्यातील व लातूर ग्रामीण मतदारसंघातील साखरा (ता. लातूर) येथे लवकरच ‘वन्यजीव उपचार केंद्र’ उभे राहणार आहे. राज्य सरकारने याला नुकतीच तांत्रिक मान्यता दिली आहे, अशी माहिती ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिली.
वन्य पशूपक्ष्यांबाबत जागृती निर्माण व्हावी, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात सध्या सुरु असलेल्या वन्यजीव सप्ताहाची आज (ता. ७) सांगता होत आहे. आजचा दिवस वन्यपशुदिन म्हणूनही ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर, आमदार श्री. धिरज देशमुख यांनी ही माहिती दिली.
मोर, काळवीट, लांडगा, ससा, साप यासह अन्य वन्य पशूपक्ष्यांचे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जखमी आणि आजारी वन्य पशूपक्ष्यांवर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. म्हणून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी वन्यजीव उपचार केंद्राची (Transit Treatment Center) राज्य सरकारकडे मागणी केली.
या मागणीची व या संदर्भात झालेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्य सरकारने साखरा येथे हे उपचार केंद्र उभारण्याबाबत नुकतीच तांत्रिक मान्यता दिली आहे. याबद्दल राज्य सरकार व वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी आभार मानले. केंद्र उभारणीबाबतची पुढील कार्यवाही सुध्दा तातडीने व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.-
जिल्ह्यांतील वन्यजीवांवर होणार उपचार
लातूर जिल्ह्यातील वन्यजीव उपचार केंद्र हे लातूर ग्रामीण मतदारसंघातील साखरा येथे करण्याची माझी मागणी पूर्णत्वास येत आहे. यामुळे येथे लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यांतील जखमी व आजारी वन्य पशूपक्ष्यांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे. यामुळे मुक्या जीवांचे खऱ्या अर्थाने संरक्षण व संवर्धनही होईल, असा विश्वास आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.—