लातूरच्या १५तरुणांनी केला नवीन विक्रम…!

0
5364

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे आंतरराष्ट्रीय धावपट्टु ओमकार स्वामी यांच्यासोबत लातूरच्या 15 तरुणांनी बनवला नवीन विक्रम…!

लातूर,-( प्रतिनिधी )-

आंतरराष्ट्रीय अल्ट्रामॅरेथॉन धावपट्टू ओमकार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वर घेऊन जाऊन, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून व राष्ट्रगीत म्हणून या सर्व तरुणांनी युवकांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे…
अहमदनगर जिल्ह्यात अकोला या तालुक्यात असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई जवळपास 1646 मीटर ( 5400 फूट ) उंच असून याला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून सुध्दा ओळखले जाते.


या धाडसी उपक्रमात धावपट्टु ओमकार स्वामी यांच्यासह डॉ.अनुजा सरवदे, डॉ. शिवानी अस्तुरे, डॉ. प्रगती शिंदे, प्रा. वैष्णवी माने, प्रा. राजश्री शेंडगे, प्रा. दीक्षा शेंडगे, गणेश बोनवळे, अजय गायकवाड, कार्तिक स्वामी, प्रकाश जाधव, सचिन स्वामी, सूरज कुरलेकर, अशितोष पवार इत्यादी खेळाडूंनी यात सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून खरोखरच या युवकांनी महाराष्ट्रातील अनेक मुला- मुलींसमोर एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे.


मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने असे गड – किल्ले, शिखर धाडसाने चढून पूर्ण करू शकतात हे या उपक्रमातील महिला खेळाडूंनी दाखवून दिले आहे. लातूर जिल्ह्यातील तरुणांना खेळाबद्दल, ट्रेकिंगबद्दल आवड लागावी यासाठी अशा अनेक मोहीम मी राबवून त्यांना प्रोत्साहित करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो. व्यसनाच्या विळख्यात न अडकता आपली ऊर्जा आणि बुद्धिमत्ता समाजकार्यासाठी व देशसेवेसाठी कशी वापरता येईल यावर अनेक तरुणांसोबत माझी चर्चा होत असते. हि मोहीम पूर्ण झालेली पाहून खरोखरच खुप अभिमान वाटत आहे कारण महापुरुषांना आपले आदर्श माना आणि त्यांचे आचार विचार आपल्या जीवनात उतरवून पुढे यशस्वी वाटचाल करा हा संदेश घेऊन ही मोहीम आयोजित करण्यात आली होती व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कारण ज्या मुला – मुलींचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, शहीद भगतसिंह, चंद्रशेखर आझाद असे महापुरुष असतील तो युवक वाममार्गाला व व्यसनाच्या अधीन जाऊच शकत नाही. आज यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या या मोहिमेची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तसेच 360 एक्सप्लोरर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असून पुढे अजून अशा मोहीम राबविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन अशी माहिती या मोहिमेचे आयोजक तथा क्रीडा मार्गदर्शक धावपट्टु ओमकार स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here