◆सुषमा अंधारे, डॉ. विठ्ठल लहाने, अभय देशपांडे, पंजाबराव डख यांना कुसूमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर…..!◆
●14 जुलै 2023 रोजी वितरण.. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार !●
नांदेड, दि. 10 ः दै.सत्यप्रभाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या कै. सौ. कुसूमताई चव्हाण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये महिला चळवळीतील नेत्या सुषमाताई अंधारे, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आणि हवामानतज्ज्ञ पंजबराव डख यांचा समावेश आहे. येत्या 14 जुलै 2023 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती दै. सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी दिली.
श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती आणि दै. सत्यप्रभाच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून कै. सौ. कुसूमताई चव्हाण स्मृती पुरस्काराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारी (दि.14 जुलै 2023) सायंकाळी 5 वाजता येथील कुसूम सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.