“सोल ऑफ इंडिया” पुरस्काराने सन्मानित
लंडन : रागी ॲग्रो समुहाचे प्रमुख तथा सुप्रसिध्द उद्योजक वेदप्रकाश शर्मा यांना लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स अर्थात ब्रिटीश संसदेत “सोल ऑफ इंडिया” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ब्रिटिश संसदेचे उपसचिव लॉर्ड बेलमी के सी यांच्या हस्ते वेदप्रकाश यांचा गौरव करण्यात आला.
इंग्लंड मधील भारतीयांच्या वतीने भारतात उद्योग आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मान्यवर व्यक्तीस “सोल ऑफ इंडिया” या पुरस्काराने गौरविण्यात येते. ब्रिटिश संसदेत पार पडलेल्या सत्कार सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री प्रदीप जैन, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक जैन, इंग्लंडच्या संसदेचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर, गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचे मुख्य कार्यकारी सचिव डॉ. राकेश मिश्रा, आयुष मंत्रालयाचे सदस्य संजीव कुमार, अंतरराष्ट्रीय रामलीला समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश टंडन, लंडनचे माजी महापौर गरिवाल यांच्यासह ब्रिटनमधील भारतीय उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये उत्साहात पार पडला.
वेदप्रकाश शर्मा हे लातूरच्या व्यंकटेश विद्यालयाच्या १९९० बॅचचे माजी विदयार्थी असून प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुणे येथील रागी ॲग्रो उद्योग समूहाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून देशभरात नावलौकिक मिळविला आहे. हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. कोरोना काळात अनेक गरजू कुटुंबांना आधार देऊन त्यांची पूर्ण जबाबदारी सांभाळली. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वेदप्रकाश यांची “सोल ऑफ इंडिया -२०२३” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
लातूरसह देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेदप्रकाश यांचे हा मानाचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.