मराठवाड़ा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक महान संत या भूमीत होऊन गेले. या संतांनी मराठवाड्याला व मराठी भाषेला वाङमयाचा मोठा वारसा दिला आहे .पूर्वी महाराष्ट्रावर मुघलांचे राज्य होते . त्या काळात सामान्य माणूस देवाच्या नावाचा जप करत असे त्यावेळी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरविले . त्याप्रमाणे राजदरबारमध्ये गायली व वाजविली जाणारी कला राजाश्रय नष्ट झाल्यामुळे लोप पावेल म्हणून पं. वि. दि. पलूस्करांनी भारतीय शास्त्रीय संगीत सर्व सामान्यांच्या घरात पोहोचविले व त्याचा जगभर प्रसार झाला .त्याच परंपरेचे पाईक असणारे पं. शांताराम चिगरी गुरुजी यांनी मराठवाड्यामध्ये शास्त्रीय संगीताला शाश्वत स्वरूपाचे स्थान मिळवून दिले.
गुरुजींचा जन्म १९३९ साली कर्नाटक राज्यातील सिंधगी तालुक्यातील खैनूर या गावी झाला . वयाच्या ९ व्या वर्षीं अंधत्व आलं. घराची आर्थिक स्थिती बेताचीच, दोन वेळेसच्या जेवणाची प्रांत, घरात कसल्याही प्रकारचे सांगीतिक वातावरण नव्हते. अंधत्व आलं म्हणून गावातील अमोघसिध्देश्वर मंदिरात बसून बसवन्नाची वचने आणि भजने ऐकत असत व त्यातुनच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. अंध असल्यामुळे त्यांची पुढे मुंबईच्या दादर अंध स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेण्यासाठी रवानगी झाली. तेथे त्यानी शालेय शिक्षणाबरोबरच संगीताचे शिक्षण ही सुरू केले. दादर अंध स्कूलमध्ये बनारस घराण्याचे महान तबलावादक पं. बद्रीप्रसाद मिश्श्र हे तबला व पं. नारायण व्यास हे गायन शिकवण्यासाठी येत असत. त्यांच्याकडे त्यांनी ६ वर्षे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी कलकत्ता येथे उ. अहमदजान थिरकवा यांच्याकडे तीन बर्षे तबल्याची तालीम घेतली, नंतर दोन वर्षे त्यांनी दिल्ली घराण्याचे महान तबलावादक उ. नत्यु खा यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पं कंठे महाराज यांच्याकडे दीड वर्षे शिक्षण घेतले, तबल्याचे शिक्षण घेत असतानाच त्याना आपले गायन मागे पडत आहे असे वाटू लागले म्हणून ते गुजरात (काठेवाड प्रांत) येथे पं. ओंकारनाथ यांच्याकडे आले व त्यांनी ३ वर्ष त्यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली. पं. ओंकारनाथ ठाकूर यांची बनारस विश्व विद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाली. त्यांना तिकडे जावे लागणार होते म्हणून त्यानी गुरुजींना पत्र दिले आणि पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे पुण्याला पाठविले. विनायक बुवांकडे त्यानी दीड वर्ष शिक्षण घेतले . गुरुजींनी मुंबई, कलकत्ता, बनारस, दिल्ली, गुजरात, पुणे अशी येथे संगीत विद्या घेण्यासाठी भ्रमंती केली . अथक परिश्रम घेऊन हालअपेष्टा काढून त्यांनी तबला व गायनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही दिवस मुंबई आकाशवाणीवर नोकरी केली. मुंबईला असतानाच त्यांनी आलबेला, साखरपुडा, हमदर्द या चित्रपटात तबलावादन केले. मुंबईला असतानाच गुरुजी सोलापूर, गदग, उमरगा, उस्मानाबाद येथे संगीत मैफिलीसाठी येत असत. त्यामुळे त्यांचा सोलापूरचे सुंद्रीवादक पं. सिद्राम जाधव यांच्याशी संपर्क येत असे. नंतर ते उमरगा, उदगीर भालकी भार्गे लातूरला आले. १९७३ साली सूर ताल संगीत विद्यालयाची स्थापना करून विद्यादान करण्यास सुरुवात केली. या कार्यात स्व. शकुंतलादेवी चिगरी यांची खंबीर साथ मिळाली आणि अनेक शिष्य घडविले.
गुरुजींना एक अंध मुलगा म्हणून कोणीतरी सांभाळलं असतं ? पराबलंबी अवस्थेकडे बघून कोणी खाण्यासाठी व राहण्यासाठी आश्रय दिला असता ? मनापासून संसार सोडलेले ईश्वरी साक्षात्काराचा ध्यास घेतलेल्या ऋषीमुनींसारखे ते कुठेतरी फिरत राहिले असते आपला जन्म गरीब कुटुंबात झाला आणि बालवयात अपंगत्व आलं म्हणून आपल्या नशिबाचा पाढा वाचत बसले नाहीत . ज्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिकेची उत्कट संस्कार गुरुजींवर झाले होते . मानवी जीवनाचा सकारात्मक तळ शोधण्यासाठी गुरुजी आयुष्यभर झगडत राहिले. अनेक महान अशा जनमानसात त्यांनी संचार केला. वारा ज्याप्रमाणे एका ठीकाणी स्थिर राहत नाही. त्याप्रमाणे संगीत साधनेची, ज्ञानाची भूक त्यांना अनेक ठिकाणी भ्रमंती करायला भाग पाडली. एकापरीने ती मराठवाड्याच्या कामी येणारी भ्रमण गाथा होती. थोर गुरुंच्या सहवासात आपला काळ व्यथीत करून त्यांनी स्वतःचा उध्दार करून घेतला. या साऱ्या भ्रमंतीचरोबर स्वतःत स्वतःला आकार देत राहिले. श्रमाविणा जीवन जगण्याची जी परंपरा समाजात घर करून बसली आहे, त्याला छेद देणारे बोलके उदाहरण म्हणजे गुरुजी होत .
1973 साली गुरुजींनी लातूरमध्ये सुरताल संगीत विद्यालयाची स्थापना करून विद्यादान करण्यास सुरुवात केली या कार्यामध्ये स्व.शकुंतलादेवी चिगरी यांची खंबीर साथ मिळाली व अनेक शिष्य घडविले .
भारतीय शास्त्रीय संगीताला शाश्वत स्वरूपाचे स्थान मिळाले.गुरुजींनी हे कार्य केले ते संवादाने.
गुरुजींनी हा इतिहास रचला त्यामुळे लातूरचे नाव देशात मोठं झालं, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवा लातूरकरांना मिळाला. लातूरच्या भूमीचा सुगंध दाही दिशाना दरवळू लागला त्याचा पाया संवादाने रचला गेला होता .गुरुजींचा संवाद खूप प्रभावशाली आणि परिपक्व होता.१९४९ सालीच गुरुजी विपत्तीच्या शिळेखाली नष्टप्राय झाल्यासारखे होते. परंतु लातूरचे, सुरताल परिवारातील शिष्यांचे भाग्यच थोर की समोर असणारा दुःखाच डोंगर पार करून ते लातूरला आले .
प्रत्येकाला जीवन जगण्याची कला शिकवली. गुरुजींचा तबला व गायन याबरोबरच सतार, व्हायोलिन, बासरी हे वाद्य वाजवण्यातही हातखंडा होता. ४८ वर्ष त्यांनी विध्यादानाचे काम केले.या सांगीतिक योगदानात त्यांनी पं. मुकेश जाधव सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिष्य निर्माण केला .त्याच प्रमाणे अनेक त्यारीचेब शिष्य निर्माण केले .घराघरात शास्त्रीय संगीत पोहचवले . लातूरमध्ये जे काही सांगितिक वातावरण निर्माण झाले आहे .अनेक संगीत क्लासेस सुरू आहेत. रसिक मंडळी व कलाकार मंडळी मोठ्या संख्येने वाढलेली आहे त्याचे सर्वश्री श्रेय कोणाला जाते तर पंडित शांताराम जिगरी गुरुजी यांना जाते आणि खऱ्या अर्थाने त्यांना लातूरचे संगीत जिवंत ठेवणारे गुरुजी म्हणावे लागेल. आपल्यानंतरही लातूरचे संगीत जिवंत राहावं या उदात्त हेतूने त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाल मंडळ , मुंबई यास ६००० स्के. फूट जमीन दान दिली.त्या ठिकाणी संगीत गुरुकुल स्थापन व्हावे ही गुरुजींची इच्छा .आज गुरुजींचे 6 वे पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त त्यांच्या सांगीतिक योगदानाला प्रणाम…
प्रा.परमेश्वर पाटील
मो. नं. ७२७६५८१९०८ patilparmeahwar10@gmail.com