प्रत्येकी एक टन बायोगॅस निर्मितीची क्षमता
देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प लातुरात -महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर/प्रतिनिधी:
घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत ३ विकेंद्रित बायोगॅस प्रकल्प उभारणीस राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज प्रत्येकी १ टन बायोगॅस तसेच प्रत्येकी ९० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. शहराअंतर्गत अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच प्रकल्प होणार असून हा पथदर्शी प्रकल्प लातुरात सुरु होत असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत मनपाने काही बाबींमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती. त्या सुधारणा राज्य शासनाने मंजूर केल्या आहेत. याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे महापौरांनी आभार व्यक्त केले. मनपाच्या मागणीनुसार शहरातील वेगवेगळ्या भागात ३ विकेंद्रित बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत प्रत्येक प्रकल्पातून दररोज १ टन बायोगॅस निर्मिती करता येणार असल्याचे महापौर गोजमगुंडे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक प्रकल्पातून दररोज ९० युनिट वीजनिर्मिती करता येणार आहे व ६० घनमीटर गॅस उत्पादित होणार आहे.
या बायोगॅस प्रकल्पांसाठी शहरातील विविध हॉटेल मधील टाकाऊ अन्न तसेच फ्रुट मार्केट मधील सडलेल्या व टाकाऊ फळांचा वापर केला जाणार आहे. याचा वापर करीत शहरातील फ्रूट मार्केट येथे पथदिवे चालविण्यात येणार असून निर्मित होणाऱ्या गॅस पासून शहरातील महात्मा गांधी चौक येथे फूड कोर्ट सुरू करण्यात येनार आहे. केवळ प्रकल्प उभारून न थांबता त्याचा शाश्वत वापर करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने यापूर्वी वरवंटी येथील कचरा डेपो येथे दररोज ५ टन गॅस निर्मितीची क्षमता असणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. देशात पहिल्यांदाच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरात विकेंद्रित बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. असे प्रकल्प उभारणारी लातूर ही देशातील पहिली महापालिका आहे. शाश्वत संकल्पित हिताचा हा प्रकल्प लातुरात साकारला जाणार असल्याची माहितीही महापौर गोजमगुंडे यांनी दिली.घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. या ३ प्रकल्पामुळे लातूर मनपा पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापनात अग्रेसर राहत असल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
चौकट…..फ्रुट मार्केट मध्ये पथदिवे तर गांधी चौकात फूड कोर्ट .. शहरात उभारण्यात येणाऱ्या ३ विकेंद्रित बायोगॅस प्रकल्पातून फ्रुट मार्केट येथे पथदिवे चालविले जाणार आहेत.या प्रकल्पा अंतर्गत महात्मा गांधी चौक येथे फूड कोर्ट देखील चालविण्यात येणार आहे. बायोगॅसच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर फ्रुट मार्केट मधील दिव्यांसाठी केला जाणार आहे. लातूर शहराला कचरामुक्त करण्यासोबतच त्या माध्यमातून बायोगॅस व वीजनिर्मिती करणारे प्रकल्प उभे करण्याचे प्रकल्प मनपाकडून हाती घेतले जात असल्याचे महापौर म्हणाले.