कोलकात्यातील अमावनीय घटनेच्या निषेधार्थ
लातुरात आयएमएसह वैद्यकीय संघटनांचा कँडल मार्च
शनिवारी सर्व दवाखाने बंद ठेवून केला तीव्र निषेध
लातूर :(वृत्तसेवा) कोलकात्यातील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आयएमए, निमा, होमिओपॅथी, आयडीए, मार्ड व नर्सिंग स्टाफ या संघटनांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी लातुरात कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते.

शनिवारी सर्व दवाखाने बंद ठेवून या प्रकरणातील आरोपीना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सर्व वैद्यकीय संघटनांच्या वतीने शनिवार अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका महिला डॉक्टरवर अमानुष बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची अमानवीय घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी लातूरच्या गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत व तेथून परत रुग्णालयापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह आयएएमचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव गणेश बंदखडके, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. गिरीश कोरे, डॉ. अभय कदम, डॉ. संगमेश चवंडा, डॉ. अजय ओव्हाळ , डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. उमेश लाड, डॉ. विमल होळंबे, डॉ. क्रांती साबदे , डॉ. सुरेखा काळे, डॉ. शांता कानडे, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ. मोहिनी गानू, डॉ. शुभांगी राऊत, डॉ.शैला सोमाणी, डॉ. ऋजुता अयाचित, डॉ.सचिन इंगळे, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ. रमेश भराटे, डॉ. महेश सावंत, डॉ. सचिन जाधव यांच्यासह शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टरशी सहभागी झाले होते.
यावेळी कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्सनी कोलकात्यात घडलेल्या या अमानुष प्रकरणाची उच्च स्तरिया चौकशी व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपीना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. विशेष करून महिला डॉक्टरांच्या सुरक्षेची काळजी, इमर्जंसी वॉर्डला सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. डॉ. उमेश कानडे, डॉ. गणेश बंदखडके यांनीही घडल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला.