अबीर गुलाल उधळीत लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल!
पंढरीचा पांडुरंग म्हणजे वैष्णव भक्तांचा जणू प्राण सखाच .कानडा राजा पंढरीचा विठ्ठल महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विठ्ठल भक्तांचे माहेर म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूर.
सासुरवाशीनीला माहेराची ओढ असते तद्वतच वैष्णव भक्तांना पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची असते. आषाढ शुद्ध एकादशी निमित्त घडणारी पंढरीची वारी म्हणजे बहु पुण्य करणाऱ्यां वारकऱ्यांची आनंद पर्वणी.याच आनंदाचा अनुभव घेण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी प्राणसख्या विठुरायाच्या दर्शनाला लाखो भाविकांना सोबत घेऊन मजल दरमजल करीत पायी पंढरीत अवतरते.
ज्ञानेश्वर माऊली यांनी संत सांप्रदायाचा पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढविला.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.म्हणून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज,संत नामदेव,संत निवृत्तीनाथ,संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संत दामाजीपंत, संत चोखामेळा,संत गोरोबा कुंभार,संत कान्होपात्रा यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाज परिवर्तनाचे महान कार्य करीत करीत समस्त जनता जनार्दनाला मिथ्या मायेतून बाहेर काढले आहे.
श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी येथील पवित्र इंद्रायणी काठावरून लाखो भाविक खांद्यावर भगव्या पताका,हातात टाळ, चिपळ्या घेऊन कपाळी अबीर गुलाल लावून टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल नामाचा गजर करीत पुणे शहरातून हडपसर मार्गे दिवे घाटातून पंढरीच्या दिशेने निसर्गरम्य वातावरणात रस्त्याच्या दुतर्फा नटलेली वनराई आणि नागमोडी वळणे घेत पालखी दिंडी सोबत पायी चालत असतात.’जे का रंजले गांजले…. तयाशी म्हणे जो आपुले’.. या उक्ती प्रमाणे गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, लहान-थोर महिला अथवा पुरुष असा कसलाही भेदभाव न करता सासर हुन माहेरला निघाल्याची आनंद अनुभूती घेत विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होतात.दैनंदिन संसाराच्या रहाट गाडग्यातून आनंदाच्या डोही ‘आनंद तरंग’ अनुभवण्यासाठी चंद्रभागेचे पवित्र स्नान करून विठुरायाला डोळे भरून पाहतात.
शेगाव,मुक्ताईनगर, गंगाखेड, नरसी नामदेव या भागातूनही अनेक दिवस पायी दिंडी सोबत पंढरपूर नगरीत दाखल झाले आहेत.
देहू आणि आळंदी इथून आलेल्या दोन्ही पालखी दिंडीची भेट वाखरी येथे झाल्यानंतर वाखरी मधील गोल रिंगणामध्ये वायुगतीने धावणारा घोडा आणि वारकरी भक्तांचे नेत्रदीपक खेळ हे खास आकर्षण आहे.
पायी पालखी दिंडी सोबत केवळ विठ्ठल नामाचा गजर नाही तर प्रवचन,कीर्तन, भारुड, फुगडी सारखे खेळ खेळताना देहभान विसरल्यामुळे विठ्ठल भक्ताच्या आनंदाला पारावार राहत नाही.पालखी दिंडी आपापल्या भागात आल्यानंतर या परिसरातील आमदार, खासदार,मंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर टाळ मृदंगाच्या निनादात नाच गाण्यात दंग होतात.आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक विठ्ठल भक्त विदर्भ प्रांतातून पंढरीकडे येतात.
वर्षभर शेतात काबाडकष्ट करणारे शेतकरी,शेतमजूर यांच्या सह शासकीय, निम शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी,शैक्षणिक,सामाजिक, राजकीय उद्योग व्यवसाय क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते.’भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी… धनी मला बी दाखवा ना विठुरायाची पंढरी!’म्हणून बळीराजाची कारभारीन सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची असलेली ओढ या अभंगातून सांगते. दिनांक 28 आणि 29 जून पासून मजल दरमजल करीत अत्यंत शिस्तीने विठ्ठल नामाचा गजर करीत लाखो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत.’
आधी रचिली पंढरी …मग वैकुंठ नगरी’ असे म्हटले जाते. लाखो भाविक भक्तिभावाने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले असताना आळंदी आणि देहू पासून पंढरपूर पर्यंत विठ्ठल भक्तांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी समाजातील दानशूर लोकही तितक्याच भक्तीने मदत करतात. सुमारे 10 लाखापेक्षा अधिक विठ्ठल भक्त पंढरपूर नगरीमध्ये येणार असल्याचा अंदाज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,नगरपरिषद पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन तसेच जिल्हाधिकारी यांना असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी ,पंढरपूर नगरपरिषद आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह कार्यकारी अधिकारी व इतर सर्व विश्वस्त यांनी भाविकांच्या दर्शनाची सुरक्षेची स्वच्छतेची करावयाच्या व्यवस्थेचे आव्हान ही समर्थपणे पार पाडण्यासाठी शिकस्त केली आहे.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लताताई शिंदे यांच्यासह मानाच्या जोडप्या सोबत दिनांक 17 जुलै रोजी पहाटे शासकीय महापूजा करून सुजलाम सुफलाम,समृद्ध,सहिष्णू आणि सुरक्षित तसेच वैभवशाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी पांडुरंगाला साकडे घातले आहे.’मनी पांडुरंग… ध्यानी पांडुरंग!’ हाच एकमेव ध्यास घेऊन अबीर गुलाल उधळीत लाखो वैष्णवांचा मेळा प्राणसख्याच्या भेटीला पंढरीत दाखल झाल्याने अवघी दुमदुमली पंढरी.राम कृष्ण हरी!
…शब्दांकन :राम कांबळे , पत्रकार औसा.
मोबाईल 9021366755.