कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय पुनपाळे; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक बाल कर्करोग दिन साजरा
लातूर, दि. 16 –
लहान मुलांना गाठीचा, रक्ताचा कर्करोग होऊ शकतो. लहान मुलांतील कर्करोगाचे निदान करणे अवघड असते. मात्र कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार देवून 80 ते 90 टक्के मुलांचा कर्करोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी न घाबरता कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यास तज्ज्ञांकडून निदान करुन कर्करोगावर योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन कर्करोग शल्य चिकित्सक डॉ. अजय पुनपाळे यांनी केले.
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग व शल्य चिकित्सा विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय पुनपाळे बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे, शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. कुलकर्णी, डॉ. दिनकर काळे, डॉ. बस्वराज वारद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्करोग हा टाळता न येणारा आजार आहे. केवळ तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनातून होणाऱा कर्करोग टाळता येतो. मात्र एखादा आजार टाळता येत नसेल तर त्याचे निदान करुन घेणे आपल्या हातात असते. कर्करोग हा इतर आजाराप्रमाणे पुर्णपणे बरा होणारा आजार असून न घाबरता त्याचे वेळेत निदान करुन योग्य उपचार घेणे गरजेचे आहे, असे सांगून पुढे बोलताना डॉ. अजय पुनपाळे म्हणाले की, लहान मुलांना आजाराबद्द्ल सांगता येत नसल्याने त्यांना आजार कळून येत नाही. त्यामुळे कर्करोगासारख्या आजाराचे वेळेत निदान होत नाही. लहान मुलातील गाठीचा कर्करोग ठळकपणे दिसून येतो. थकवा येणे, ताप येणे, बाळ नेहमी आजारी पडणे अशी लक्षणे कर्करोगाची सुध्दा असू शकतात मात्र पालक इतर आजाराप्रमाणे उपचार घेतात आणि आजार बळावतो. त्यामुळे डॉक्टरांनी लहान मुलांतील आजाराची लक्षणे पाहून योग्य निदान करणे अपेक्षीत आहे. जेणेकरुन कर्करोगाचे निदान लवकर होईल. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कर्करोगाच्या स्वरुपानुसार काही तपासण्या करुन कर्करोगाच्या उप प्रकाराची खात्री करणे आवश्यक असते.
पुर्वी कर्करोगाचा विलाज मोठ्या शहरापुरता शिमित होता. मात्र आता जिल्हा पातळीवरही कर्करोग तज्ज्ञ उपलब्ध असल्याने उपचार घेणे अवघड राहिलेले नाही. बहुतेकदा कर्करोगाचे निदान झाल्यास अनेक जन निराश होऊन आशा सोडून देतात. त्यामुळे कर्करोगावरील उपचारास उशीर होतो. कर्करोगावरील उपचार हे महागडे असले तरी उपचारासाठी शासकीय योजनांची मदत घेता येते. शिवाय समाजातील काही स्वयंसेवी संस्थाचीही उपचारासाठी मदत होऊ शकते. त्यादृष्टीने पालकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
कर्करोगावर एकापेक्षा अधिक उपचाराची गरज असते. यामध्ये शस्त्रक्रिया महत्वाची असून आजाराची पातळी पाहून केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि गरजेनुसार इम्युनो थेरपी अशा स्वरुपातील उपचार केले जातात. कर्करोगावर केवळ शस्त्रक्रियेतून पुर्ण विलाज होत नाही. त्यामुळे कर्करोगावरील उपचार पध्दती विषयी पालकांना अवगत करणे आवश्यक असते. कर्करोगावर दोन – तिन प्रकारच्या उपचार पध्दती घेणे आवश्यक असून त्यामुळे आजार पुर्णपणे बरा होण्यास मदत होते, असे डॉ. पुनपाळे यांनी सांगितले.
या वेळी डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, कर्करोगाचे निदान होईपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी जागरुक राहावे. 30 टक्के बालकांना मेंदू, आतडे, स्वादूपिंड व रक्ताचा कर्करोग होत आहे. कर्करोगाची लक्षणे दिसून आल्यास तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावेत. कर्करोगावर उपचार घेवून आयुष्यक वाढवता येते असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. सरिता मंत्री, डॉ. शिल्पा दाडगे, डॉ. अव्दैत देशपांडे यांनी कर्करोगाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या कांदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रोहित माले यांनी केले तर आभार डॉ. हार्दि मलवानी यांनी मानले. या प्रसंगी डॉ. प्रविण डोले, डॉ. एस. डी. कुलकर्णी, डॉ. इरपतगिरे, डॉ. रायते, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, प्रा. पद्मावती, सहाय्यक अधिसेवक मारुती हत्ते, मिना पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहित माले, डॉ. स्वप्नीता गुट्टे, डॉ. सोनल रे, डॉ. अपर्णा आस्था, डॉ. अखिलेश अनजान, डॉ. व्यंकटेश माहुरे, लिपीक किरण साबळे, रवी रसाळ, परिचारीका भाग्यश्री चोपडे, सेवक सुग्रिव केंद्रे यांनी परिश्रम घेतले.
——————————————————–