अर्थ
गाडगे महाराजांच्या नावे सुरु झालेल्या धर्म शाळेत वस्तीला आलो या गोष्टीला आता तीस वर्ष वर्ष पूर्ण होत आली असावीत. हिशोब न ठेवता ही, कांही तारखा, महिने, प्रसंग क्षीण झालेल्या डोळ्यां समोर फिरत असतात.
छोटं घर, छोट्या घरा समोर छोटं आंगण होतं. आई, बाबा होते. पाळीव पोपट होता. एकेक करून सगळे नाहीसे झाले. आईचा आजार दूर करायचा म्हणून घर विकलं, जवळ होते ते सगळे पैसे लावले पण तिचं आजारपण दूर झालं नाही. शेवटी आजारपणा बरोबर, ती गेली!
मरमर, धडपड, काळजी, जागून काढलेल्या रात्री आणि कायमच्या ताण तणावात काढलेले दिवस..सगळं असं वाया गेलं. अर्थ कशालाच उरला नव्हता.
आईच्या आजार पणा मुळे आलेल्या मनःस्तापा पायी अनेक माणसं दूर झाली. का असं झालं असावं, मला कळायचं नाही. तुटलेली नाती आणि तोडलेली फांदी परत जोडता येत नाही, कळायला सोपं तरी मला कळलं नव्हतं!
नाती जपण्याचं वेगळं गणित असतं, सहावीत असतांना फजल अहमद सांगायचा….
चिखल करायचा म्हणून कोरड्या मातीत आधी पाणी मिसळायचं. मग चिखलातलं पाणी आटलं, की मातीचं आधीचं भूस भुशीत रूप इतकं बदलून जातं, की ओळख पटत नाही….
नात्यातला ओलावा आटला, की कधी काळी जवळ असणारी, हवी हवीशी वाटणारी कोमल मनाची माणसं, दूर होतात. त्यांची मनं, पाणी आटून गेलेल्या चिखला सारखी होतात, कडक, टोचणारी, फजल बोलला होता.
आई बाबां मधे सतत सुरु असलेला अबोला, जीवघेण्या युद्धा पेक्षाही भयावह वाटायचा. घरी जायला नको वाटायचं. घरी असलो, तर मनाची घालमेल सुरु असे. अनेक वेळा अंगावर सदरा न घालता बाहेर पडायचो.
फजल आणि मी, शाळे जवळच्या तळ्या काठी तास न तास बसून रहायचो. घरी आई बाबा होते तरी माझी वाट पाहणारं कुणी नाही, वाटत रहायचं.
वाट पहाणार कुणी नव्हतं म्हणून फजल आनंदी आनंदी असेल? आनंदी असूनही तो माझं दुखः का वाटून घेत असावा, मला प्रश्न पडायचा.
छोटे मासे, पाण किड्यांचा शोध घेत, काळे पांढरे पक्षी पाण काठावर बसलेले असतं. वाटायचं, पक्षी व्हावं! हवं तिथे, हवं तेंव्हा जावं. फजल ला मनातली गोष्ट सांगितली.
फजल च्या चेहऱ्यावर उमटलेल्या रेषा, वाचता येऊ नयेत इतक्या अवघड होत्या. पाण्यात बुडवून ठेवलेला पायाचा अंगठा आत, बाहेर करत फजल म्हणाला, जिंदगी, मग कुणाचीही असो, वाईटच असते.
मला तुझं, तुला माझं आणि आपल्या दोघांना पक्ष्याचं आयुष्य छान वाटतं. फक्त दुरून! पण जिंदगी बुरी असते. अम्मी ने माझ्या, आयुष्य संपवलं होतं. मालूम है, सुरीने स्वतःचा गळा कापला होता तिने!
पक्षी का व्हायचंय? दगड, गोटे का नाही? जिंदगी म्हणजे घोर निराशा. न संपणारा काळोख. फजल बोलला होता.
मला कधी न कळणाऱ्या गोष्टी त्याला कळतात कशा, मला नाही कळायचं!
पुढे, बाबा गेले. घर शांत झालं. शांतता, आईला मानवली नसावी. जो माणूस चुकून नीट बोलायचा नाही, तो आयुष्यातून दूर झाला या गोष्टीचं आईला वाईट का वाटावं? तिने आजार काढला. ताण, तणावा शिवाय जगणं, तिच्या नशिबात नसावं!
मागे वळून बघायला कांही शिल्लक नव्हतं. घर, आंगण आईचं आजारपण घेऊन गेलं होतं. मोकळ्या आकाशात सोडून देऊन, पोपटाला त्याच्या नशिबाच्या हवाली केलं. फजलचा निरोप घेतला आणि इथे आलो.
आता सत्तरी पार करून खूप पुढे आलोय. कधी काळी मुक्त फिरणारे पक्षी, पहाटे रंग बदलणारं आकाश बघायला दूर दूर जात असे. आता उत्साह संपला किंवा मग, शिळा झालाय. मोकळ्या मैदानावर असलो तरी पक्ष्यांकडे नजर जात नाही.
सबनीस, आश्रमाचे विश्वस्त, सांगतील ते काम करतो. मुद भर भात, वाटीभर आमटी पण खावीशी वाटत नाही. फुकटचं अन्न, नको वाटत. सकाळचं एक जेवण घेतो. रात्री वाढपी होतो.
जेवायची खोली, झाडून घेतो. भांडी घासायला हरी ची मदत करतो. जेवणाचे पैसे पडेल ते काम करून फेडत जातो. तरीही अपराधी भावना मनातून जाता जात नाही.
आहात तेव्हडा काळ, आयुष्य नावाचा उत्सव, साजरा करा. मदत करणारे हात आहेत म्हणून, पानं वाढता येतात. अन्ना वाचून कुणी जायला नको म्हणून, ही सोय आहे ना? मग उपाशी का रहाता? सबनीस म्हणायचे.
एकदा तरी का जेवत होतो, जिवंत रहायचं होतं म्हणून का मृत्यू नको होता म्हणून? उत्तरं गवसावं म्हणून, उगवत्या, मावळत्या सूर्या बरोबर रात्रीच्या काळोखात भ्रमण करणारे काजवे आणि मुक्त वाहणाऱ्या आकाश गंगे कडे पाहात बसायचो. मान अवघडाची. कारण, पुढ्यात नाही आलं!
भल्या पहाटे जाग आल्या पासून अस्वथ वाटायला लागलं म्हणून, मोकळ्या हवेत येऊन बसलो. कधी काळी निळ्या आकाशात मुक्त भ्रमण करणारे पक्षी, पहाटेच्या केशरी रंगात रंगलेला परिसर बघायला आवडायचं. अलीकडे रंग आणि मग पक्षी, बघावेसे वाटत नाहीत.
मानेतला एक, का मग दोन मणके, ढिले पडल्याचं निदान, आश्रमात आलेल्या डॉक्टरांनी चार सहा वर्षां पूर्वी केलं होतं. मणक्यांना माळणारा दोर, एक दोन जागी तुटल्याचं त्यांनी सांगितलं. वय बघता तुटलेल्या भागाची दुरुस्ती अशक्य असल्याचं, ते बोलले. मला तेच हवं होतं. तुटलेले भाग जोडून आयुष्य वाढवायचं नव्हतं.
सुध्या, तू इथे?
घामेला सदरा अंगावर असलेला कुणी, माझ्या पुढ्यात होता. या गावात आल्या पासून माझी ओळख, धर्म शाळे पुरती मर्यादित आहे. तशी ती रहावी, म्हणून काळजी घेत होतो. असं असलं तरी सुध्या म्हणून हाक देणारं कोण होतं? उठून उभा झालो.
चष्मा, कांही दिवसां पूर्वी तुटला. वाईट तुटला. दुरूस्ती साठी लागणारे पैसे, जवळ नव्हते. दुकानदार दहा टक्के रक्कम कमी करतो म्हणाला. मला दिसावं म्हणून, त्याने त्याचं नुकसान करून घेतलेलं मला आवडणार नव्हतं. शिवाय नव्वद टक्के रकमेच्या एक टक्का रक्कम पण, माझ्याकडे नव्हती.
सगळं, हे असं आहे. आयुष्य, टक्केवारी वर तोलल्या, मापल्या जातं. अर्थ, कशालाही नाही. ना एक टक्क्या ला ना मग शंभर टक्क्यांना!
सतीश? तू? तू इथे कसा? माझा जिवलग मित्र. वाळवंटात मृगजळ दिसावं तसं ध्यानीमनी नसतांना समोर होता. विश्वास बसेना!
आता सांग, या उजाड जागी तू कसा? सतीश ने विचारलं.
अलीकडे पक्षी, आकास बघत नाही. मोकळी हवा पोटात भरून घेतली की भूक अदृश्य होते म्हणून इथे येतो. सतीश ला सांगितलं.
जुन्या चष्म्याच्या जुन्या काचांना, जुन्या सदऱ्याच्या बाहीचा उपयोग करून, सतीश ने पुसून घेतलं. मला नीट न्याहाळता यावं म्हणून!
सतीश, माझा जवळचा मित्र. आयुष्याचे खरे भोग भोगले असतील, तर माझ्या या मित्राने. नाती सिंगल फेज वर चालत नाहीत, सतीश ला कधी कळलं नाही. लोकांनी लुटलं, याने लुटू दीलं!
अनेक वर्ष भेट झाली नसली तरी, आमच्या मैत्रीचं रसायनच वेगळं आहे. पंचामृता सारखं! कडू, तुरट, गोड, आंबट एकाच वेळी सुरु असतं!
आमची मैत्री नेहमी साठी घट्टय. मी लाट, सतीश समुद्रय, फजल बोलला होता. नेमकं काय म्हणायचं होतं त्याला त्या वेळी, साठ वर्षां मधे मला कधी नाही कळलं!
तू इथे, या छोट्या गावात? सतीश ला विचारलं.
हो. आहे खरा. आता घरी चल. झालं गेलं, काय गेलं, सांगतो सगळं. सतीश म्हणाला.
ओळखीचे चेहरे डोळ्या समोर परत कधी येऊ नयेत म्हणून घर, गाव सोडून, या छोट्या गावात आलो. पण..पृथ्वी फिरते म्हणून माणसं असे कुठेतरी भेटतात, का मग माणसं फिरत असतात म्हणून भेट होते? कालांतराने या गोष्टी थांबायला हव्यात, वाटलं मला.
ओळखीचं पिश्याच्य आठवणी होऊन मरे पर्यत पाठीवर बसून असतं, पाठलाग सोडत नाही, अहमद म्हणायचा. किती खरं होतं!
सबनीसां ना सांगून बाहेर पडलो.
सतीश, धावत पळत होता. या वयात ही त्याला धावतांना पाहून, म्हाताऱ्या हरणीची गोष्ट, आठवली…
काल, परवाच्या गोष्टी मनातून पुसून टाकायचे आजवर केलेले सगळे कष्ट फोल ठरलेत. आठवणींना मागे सोडून आलो, निव्वळ भ्रम आहे. आठवणींनी मला सोडलं नाहीय, आज जाणीव होतीय.
चाळी वजा इमारतीच्या तिरप्या कोपऱ्याचा मध्य साधून असलेल्या खोलीचं दार, सतीश ने उघडलं. माझ्या मागोमाग माझी सावली, खोलीची भिंत चढून, छताला चिकटली. सावली असते तेंव्हा उजेड मागे आहे, खात्री असते.
सतीश आतल्या खोलीत पळाला. दोन मिनिटांनी, बाहेर आला. एकटा नव्हता. त्याच्या कडेवर तीन चार वर्षांची मुलगी होती.
ही सई. अर्चना ची मुलगी. वर्ष दोन वर्षे झाली असावीत. माझ्याकडे असते. झोपेत असलेल्या सई ला मांडीवर आडवी घेऊन, सतीश बोलला.
पाच एक मिनिटात जागी होईल. मला जागं ठेवून ही, झोपते! बदमाश आणि खोडकर आहे. तिच्या वयाचा होतो तेंव्हा, आईची नजर चुकवून घरा जवळ असलेल्या नदी काठी मी पळून जात असे, आई सांगायची.
आता लक्ष देणारं कुणी नाही पण, आता पळता येत नाही, पळत जाऊन कांही बघावं, कुणाला भेटावं, अशी इच्छा पण होत नाही.
उन खूप झालं की सावलीची आठवण होते. दुखः अति झाले की, मगच सुख शोधायला लागतो आपण. खूप एकटेपण जाणवायला लागलं, की सोबत हवीशी वाटते. आहे हे असं आहे.
माझ्या जाणीवा संपल्यात जमा आहेत. या पोरीचा सांभाळ करायचा म्हणून ही असेल, थोड्या कांही अजून शिल्लक आहेत. हिला कळायला लागे पर्यत माझ्या जाणीवा अबाधित रहायला हव्यात नाहीतर…
उभा का? सतीश बोलला.
सतीशचं घर, सायकल दुरुस्ती दुकाना पेक्षाही वाईट होतं. तुटलेली खेळणी, फुटलेले कप, बशा घरभर विखुरल्या होत्या. सोफ्या मधला कापूस, सोफा वगळता घरभर पसरला होता. चार पाच ठिकाणी भाकरी पोळीचे तुकडे, भाताची शीतं होती…
राठ खांद्यांना कोवळं ओझं मानवत नाही, खात्री होत होती!
कोपऱ्या मधला त्रिकोण साधून, बसलो. घरात सतीश सोडून बघण्या सारखं कांही नव्हतं. डोळे, सतीश वर लक्ष ठेवून होते.
अर्चना ने तिला आवडत्या मुला बरोबर लग्न केलं. बायकोचा लग्नाला विरोध होता. सतत आवडीच्या गोष्टी मागे धावत रहाणारी बायको ही गोष्ट पार विसरून गेली, की तो मुलगा अर्चनाला आवडला होता.
बायको साठी किती तरी नको असलेल्या वस्तू घरात आणून, नको तो ताण, आधीच आणला होता मी. अर्चनाच्या लग्नाचा ताण नको म्हणून, लग्न लाऊन दिलं. बायकोच्या इच्छे विरुद्ध जाऊन!
लग्ना नंतरची दोन वर्ष छान गेली. त्या दोघांची का मग आमची, कधी कळेलंस वाटत नाही. कळायला नको ही. सई रांगायला लागली होती.
त्या दोघां मधे नेमकं काय झालं, आम्हाला नाही कळलं. तो घर सोडून गेला. अर्चना आयुष्यभर एकटी कशी राहिलं, सई चं काय होईल, अशा अनेक चिंतांनी हीचा पाठलाग करायला सुरुवात केली. माझं ऐकलं असतं तुम्ही दोघांनी तर…ती एक सारखं म्हणायची.
कसलं कसलं दडपण तिच्या मनावर होतं, मला नाही कधी कळलं. न सांगितलेल्या ओझ्या खाली, ती दबत गेली. सईचं का मग अर्चनाचं ओझं, माझ्या खांद्यावर ठेवून ती गेली.
अर्चनाला सई ची जिम्मेदारी नकोय. तिला तिची नौकरी सांभाळायचीय. परिचित लोकांचे टोमणे टाळायचे म्हणून, सईचं छोटं ओझं, तिने माझ्या हवाली केलंय.
हिला बघायला, भेटायला एकदा आली होती. एक दिवस राहिली. जातांना कांही पैसे टेबल वर ठेवून म्हणाली, बाबा, तुमच्या जवळ किती आनंदी आहे ही!
काय बोलणार होतो? कुणाला? आपण भेटलो तिथे पिंपळ आहे. त्या पिंपळा बरोबर मनातल्या गोष्टी, दुखः, शेअर करतो. कधी वाटतं, पिंपळाने त्याची दुखः माझ्या बरोबर शेअर केली तर किती छान झालं असतं!
आता पर्यंतच्या जगण्याला थोडा फार रंग होता. अर्थ होता. रंग आधी उडतो का जगणं आधी निरर्थक होतं, नाही कळलं कधी. सईला अनाथालयाच्या स्वाधीन करून मोक्ष प्राप्तीच्या शोध घेत जावं, असा विचार अनेकदा मनात आला…
खाण्याचा खर्च भागेल इतके पैसे अर्चना दर महिन्याला पाठविते. मागच्या वर्षी अर्ज देऊन फोन काढून टाकला. दुध बंद केलं. हिच्या साठी खेळणी आणायला पैसे लागतात. शाळेत टाकीन म्हणतोय. खूप करायचंय पण…
कांही करावंसं वाटत नाही. कधी पैसे नाहीत म्हणून, कधी इच्छा होत नाही म्हणून तर कधी सगळं अर्थहीन वाटतं, म्हणून! सतीश बोलत होता.
एव्हाना सई जागी झाली होती. देखणी आहे, माझ्या लक्षात आलं. तिने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मग नजर सतीश कडे वळली. दोनदा कुणी पाहावं असा माझा चेहरा नाहीय, जाणून आहे मी!
तिची छोटी, कोवळी बोटं, सतीशच्या गालावरून फिरत होती. त्याचा विझू पाहणारा चेहरा, शांत पणे तेवत राहणाऱ्या शुक्र ताऱ्या सारखा प्रकाशमान झाला होता.
माझ्या अर्थहीन जगण्याला या मुलीने, अर्थ दिला. बघतो आहेस ना? तिची चिमुकली कोवळी बोटं माझ्या राठ गालावरून फिरातायत ती?
आयुष्य नकोसं झालं होतं. खरं सांगतोय. दोनदा, घर सोडून जाण्याचा विचार केला. चार सहा पावलं पुढे जातात आणि दहा, मागे आणून ठेवतात.
हिच्यात पूर्ण अडकून पडलोय. मृत्यू आला तरी सईतून आता सुटका नाही, लक्षात आलंय. सतीश ला बरंच कांही सांगायचं होतं पण सई, रडायला लागली.
हो, विसरलो मी. भूक रडतीय ना तुझी?
बघतोयस ना? दिवस असा संपतो. खिचडी टाकू? जेवून जाशील ना? पण जायचंच का? रहा इथे. माझ्या बरोबर सई ला छान वाटेल.
सईला खिचडीची सवय लावलीय. करायला सोपी. पचायला सोपी! तू आलास म्हणून आज किती बोलतोय मी. खूप वर्षांनी मन मोकळं व्हायला लागलंय. खूप बोलायचंय अजून. एका हाताने खुर्चीचा आधार घेत, सतीश उठला.
सतीश कडे पहावत नव्हतं, बायको असे पर्यत हा कमालीचा टापटीप राहायचा. अंगावरचा मळकट सदरा तिने पाहिला असता, तर याची वाट लागली असती.
खिचडी ठेवायला म्हणून सतीश स्वयंपाक घरात गेला. अर्चना, सईच्या गोष्टीत दडलेला अर्थ, शोधत उभा होतो.
अर्चनाचा नवरा तिला सोडून जातो, कांही महिन्याच्या मुलीची जवाबदारी ती, आजारी, एकटे रहाणाऱ्या म्हाताऱ्या वडिलां कडे सोपवून निघून जाते… सरते शेवटी सतीश सई मधे जगण्याचा अर्थ शोधत असतो….
एका मोडक्या खेळण्यावर पाय पडणार होता..कसंसं झालं. सतीश ला न सांगता, बाहेर पडलो.
उन बरंच तापलं होतं तरीही सावली नको होती. धर्मशाळा, तळ्याचं शांत पाणी, सतीश चा पिंपळ, अर्चना आणि सई..सगळ्यां मधे जगण्याचा अर्थ शोधीत, तळ्याकाठी पोहचलो.
पाण्याला स्पर्श करून येणारी वाऱ्याची गार झुळूक शरीर गार, पण मन, उद्विग्न करून गेली.
अस्थिर मन घेऊन तळयाच्या स्थिर पाण्या समोर बसलो. माझा पाण्यात उमटलेला माझा अगोड चेहरा, बघवेना. छोटी गारगोटी पाण्यात टाकली. पाणी हललं….
पाणी हलल्या बरोबर माझ्या चेहऱ्याचे असंख्य तुकडे पडले. एकेक तरंग, एकेक तुकडा घेऊन गेला. एक तुकडा एव्हाना, पलीकडच्या काठाला लागला असावा, मला वाटलं…
अर्थ शोधत होतो… मी आणि तरंगाने वाहून नेलेल्या माझ्याच चेहऱ्याच्या असंख्य तुकड्यांचा…
+++++
धन्यवाद
अनिल महाजन
मुंबई. ०२०७२१