वडवळ नागनाथ, दि ९ – धावपळीचे जीवन जगताना विविध प्रलोभनामुळे “समाज ऋण” फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. मानवी जन्म हा तिन ऋण घेऊन जन्माला येत असतो. मात्र दिवसेंदिवस ऋण मुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच मातृ – पितृ ऋण, गुरू ऋण यांच्या सोबतच “समाज ऋण” अंगिकारले पाहिजेत; असे प्रतिपादन सेवा सोसायटीचे संचालक संभाजी रेकुळगे यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील बसवेश्वर चौकात लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त ‘समाजसेवा’ या विषयावर भव्य वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती; यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन संचालक संभाजी रेकुळगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कादंबरी ‘हिरकणीचे बिराड’ च्या लेखिका सुनीता अरळीकर, प्राध्यापक संजय गवई, कलापंढरी संस्थेचे बी.पी सूर्यवंशी, सविता कुलकर्णी, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, ग्रामपंचायत सदस्य महादेव सूर्यवंशी, नूर पटेल, विवेकानंद लवटे पाटील, कॉमेश कसबे, रेखा कसबे, शिवशंकर टाक, भरतसिंह ठाकुर आदिजण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून गावातील निराधार वृद्ध महिला पद्मीनबाई सुनपे यांना साडी-चोळी, शाल – सतरंजी इत्यादी वस्त्र देऊन करण्यात आली. या कृतीतून समाजसेवेचा एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा बालाजी बेंडके यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेच्या ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी सिमरन मुजाहीद्द पठाण व अमन मुजाहिद्द पठाण या सख्या बहिण-भावाने प्रथम क्रमांक पटकावला तर दुर्गा बालाजी यमपल्ले व श्रावणी विश्वनाथ देवकत्ते यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचे समीक्षक म्हणून संजय गवई आणि बी.पी सूर्यवंशी यांनी काम पाहिले.यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी बी.पी सूर्यवंशी, संजय गवई व सुनीता अरळीकर यांचे भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी बेंडके यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंग भुरे यांनी केले तर आभार मायाताई सोरटे यांनी मानले.