• अभिनेते संदीप पाठक यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दि. 14 (वृत्तसेवा ): सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग आज महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनात सादर झाला. काशिनाथच्या लग्नासाठी लंडनला निघालेल्या ग्रामीण भागातील वऱ्हाडी मंडळींची लगीनघाई संदीप पाठक यांनी दमदारपणे प्रक्षकांसमोर मांडण्यात आली. अस्सल ग्रामीण भाषेतील संवादातून सादर झालेल्या या विनोदी एकपात्री प्रयोगाने लातूरकर प्रेक्षकांना खळखळून हसविले.
मराठवाड्यातील एका गावातील काशिनाथ हा युवक लंडन येथे शिक्षणासाठी जातो आणि तेथील एका ब्रिटीश युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्याशीच लग्न करण्याचा हट्ट कुटुंबाकडे करतो. त्यामुळे त्या दोघांचे लग्न जमते. या लग्नासाठी मराठवाड्यातील एका खेड्यातून लंडनला जायला निघालेल्या वऱ्हाडी मंडळांची लगीनघाई, त्यांचा विमानप्रवास यादरम्यान घडणारे प्रसंग अस्सल ग्रामीण भाषेत सादर करून संदीप पाठक यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली.