लातूर ; दि.३ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब लातूरच्या वतीने आणि आर. के. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे या संस्थेच्या सहकार्याने एम.जे. हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट नाथ पिठाचे पिठाधीश सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पित करण्यात आले.
बार्शी रस्त्यावरील स्वर्गीय ईश्वर राठोड यांनी स्थापित केलेल्या एम.जे. हॉस्पिटलमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात हा लोकार्पण सोहळा पार पडला .याप्रसंगी मंचावर सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल रुकमेश जखोटिया, अतिरिक्त प्रांतपाल डॉ.पी.एस. दरक ,आर. के. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे राजकुमार चव्हाण (पुणे ) ,रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष सुनील कोचेटा,सचिव श्रीमंत कावळे , एमजे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड, रोटरीचे प्रकल्प अध्यक्ष डॉ.विनोद लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती .
प्रारंभी सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते फीत कापून व मशीनचे पूजन करून डायलिसिस युनिटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गहिनीनाथ महाराजांनी डायलिसिस युनिट बद्दल माहिती अवगत करून घेतली .त्यांना सुनील कोचेटा ,डॉ.मेहुल राठोड यांनी माहिती दिली .आपल्या आशीर्वचनात सद्गुरु गहिनीनाथ महाराज म्हणाले की, व्यक्ती पाहून रोग होत नाही .तो श्रीमंतातील श्रीमंत आणि गरिबातील गरीब माणसाला देखील होतो. रोग कोणालाही होतो . कर्करोग , लिव्हर, हृदयरोग, किडनी विकार आदी आजार हे भयानक व खूप खर्चिक आहेत .
लातूरमध्ये रोटरी क्लबच्या वतीने एमजे हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट चालू झाल्याबद्दल गरजू रुग्णांची सोय होणार आहे .कमीत कमी खर्चात गरजू व गरीब रुग्णांना या युनिटची सोय उपलब्ध करून द्यावी आणि स्वच्छता व देखरेख करण्यासाठी व्यवस्थापनाने कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे , अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
डायलिसिसची आवश्यकता उपयुक्त व खर्चिक असल्याने प्रत्येक दानशूर व्यक्तीने रुग्णांना दत्तक घेऊन दररोज याप्रमाणे 30 दिवस वाटून घेतले तर खऱ्या अर्थाने गरजू व गरीब रुग्णांना मदत होईल. यासाठी दानशूर व्यक्तीने पुढे यायला हवे असे , आवाहनही गहिनीनाथ महाराज यांनी केले .
आपल्या प्रास्ताविकात रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील कोचेटा यांनी आपल्या कारकिर्दीत कोणकोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले गेले त्याचा थोडक्यात धांडोळा घेतला. रुकमेश जखोटिया, डॉ.पी.एस. यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले .डॉ. मेहुल राठोड यांनी या डायलेसिस युनिट संदर्भात माहिती दिली. सोमवारपासून हे डायलिसिस युनिट रुग्णांच्या सेवेत रुजू होईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.कार्यक्रमाच सुत्रसंचालन डॉ. विनोद लड्डा यांनी केले.