औसा – आ. अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी, रोहयो व वस्त्रोद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठक आयोजित करून चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आयोजित या तिन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी रेशीम विभाग कृषी विभागात वर्ग करण्याची मागणी केली. यावर रेशीम विभाग कृषीत वर्ग करून रेशीम योजना कृषी विभागामार्फत मनरेगा अंतर्गत राबविण्यासाठी कृषी सचिवांनी सहमती दिली असून लवकरच प्रस्ताव तयार करून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
११ जुलै रोजी आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योजक बनविण्यासाठी रेशीम विभाग कृषी विभागात वर्ग करून रेशीम योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात यावी अशी विनंती केली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित या बैठकीत रोहयो अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, कृषी सचिव एकनाथजी डवले, वस्त्रोद्योग सचिव पराग जैन व तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी रेशीम विभागाकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची ५६% पदे रिक्त असून लवकरात लवकर पदभरती करण्यात यावी.अशी मागणी केली. सदरील पदे डिसेंबर २०२२ पर्यंत भरण्याचे या बैठकीत ठरले छत्रपती संभाजीनगर येथे तुती अंडकोष केंद्र सुरु करण्यात यावे तसेच तुती लागवडीसाठी असलेले अनुदान ३.३२ लक्ष वरून वाढवून ५ लक्ष रुपये करण्यात यावे या आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीवर तुती लागवडीच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कृषी सचिवांनी यावेळी दिल्या आहेत. सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करून अनुदान ५ लक्ष रुपये करण्यात यावे तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींची किंमत वाढविण्यात यावी व सार्वजनिक विहिरींची प्रलंबित अकुशल देयके तात्काळ अदा करण्यात यावीत हि मागणी केली.यावर प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
यासह मनरेगाअंतर्गत जुन्या विहिरींची कामे करण्यास केंद्र शासन मंजुरी देईपर्यंत रोहयो योजनेतून जुन्या विहिरींची कामे करण्यासाठी योजना सुरु करावी.गोठा बांधकामाचे अंदाजपत्रक घरकुलाच्या धर्तीवर तयार करण्यास परवानगी देऊन अकुशलचा रेशिओ ६०:४० करण्यात यावा. रोहयो विभागामार्फत बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना लागू कराव्यात.क वर्ग नगरपालिका हद्दीत रोहयोच्या योजना लागू करण्यात याव्यात. बांबू लागवड करून शेतीसाठी कुंपण तयार करण्यासाठी विशेष योजना आणावी. सिंचन विहीर, गोठे आदी वैयक्तिक योजनांचे मजुरांचे मस्टर प्रलंबित असून ते देण्याबाबत त्वरित कारवाई करावी. पीएम किसान सन्मान योजनेपासून आजही अनेक शेतकरी वंचित असून सदरील योजनेत शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी विशिष्ठ अभियान राबवावे.औसा येथे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात यावे.तुती लागवडीसाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत केवळ शिवरस्त्यांची कामे मंजूर करावीत उर्वरित प्रकारच्या शेतरस्त्यांची कामे मनरेगाअंतर्गत जिल्हा/तालुका पातळीवर मंजूर करण्यात यावीत.आदी मागण्यांबाबत आ. अभिमन्यू पवार यांनी या बैठकीत पाठपुरावा केला .