गेटकेनचा ऊस आणून सभासदावर संकट आणले;
रेणाच्या कार्यकारी संचालकाचा भाजपातर्फे सत्कार
लातूर दि.०७ – कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा ऊस १८ – १९ महिन्यांपासून उभा असताना मोठ्या प्रमाणात कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरील गाळपास ऊस आणल्याने शेतकरी सभासदासमोर मोठे संकट निर्माण केले या निस्वार्थ कृत्य केल्याबद्दल रेणा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाचा रेणापूर तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकरी सभासदांचा मोठ्या प्रमाणात तब्बल १८-१९ महिन्यांपासून ऊस उभा आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकर्यांकडे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ऊसाचे वजन झपाट्याने घटत आहे. रक्ताचे पाणी करुन दिवसरात्र मेहनत करुन ऊसाच्या पिकाला जोपासणार्या शेतकर्यांचा ऊस वेळेवर जात नसल्याने जगावे का मरावे हा प्रश्न ऊस उत्पादकांच्या समोर निर्माण झाला आहे. कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमात आणागोंदी कारभार होत असल्याने शेतकर्यांना मोठ्या संकटाला तोंड देण्याची पाळी आली असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय, सर्वांचा ऊस आणणार असा डंका वाजवणार्या रेणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांची भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यालयात भेट घेवून सत्य परिस्थीती बाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर चालू गळीत हंगामात कारखान्याचे आत्तापर्यंत किती गाळप झाले, एकूण गाळपापैकी शेतकरी सभासदांच्या आणि कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरील ऊसाचे गाळप किती झाले याबाबतची माहिती जाणून घेतली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक मोरे यांनी स्वत:चा २५० किलो मिटीर अंतराहून २०० हून अधिक टन ऊस गाळपास आणला त्याचबरोबर कार्यकारी संचालकासह कारखान्याच्या संचालकांनी आपले पाहुणे, नातलग व इतर अनेकांचा कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणून कारखान्याच्या शेतकरी सभासदांचा ऊस जागेवरच वाळवण्याचे काम केले. गेटकेनचा ऊस आणल्यामूळेच ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामूळेच शेतकर्यांवर मोठे संकट ओढावले आहे. कारखाना प्रशासन आणि संचालक यांनी गेटकेनचा ऊस आणून निस्वार्थ कृत्य केले त्याबद्दल भाजपाच्या वतीने रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांचा सत्कार केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सवरदे, भाजपा किसान मोर्चाचे रेणापूर तालुकाध्यक्ष शिवमुर्ती उरगुंडे, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, श्रीमंत नागरगोजे, उज्वल कांबळे, महेश गाडे यांच्यासह अनेकजण होते.