‘
अभिनव गोयल यांचे प्रतिपादन; भादा येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ
—
लातूर:
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचनसंस्कृती वाढवणारा, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवणारा ‘रीड लातूर’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व कौतुकास्पद असा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल यांनी येथे केले. ‘रीड लातूर’ हा उपक्रम लोकचळवळ बनला पाहिजे. यातून सुजाण नागरिक घडू शकतील, असेही ते यावेळी म्हणाले.
मोठ्या शहरात सहज उपलब्ध होणारी आधुनिक विषयांवरील पुस्तके ग्रामीण भागातील मुला-मुलींपर्यंत पोचावीत यासाठी सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आणि ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या ‘रीड लातूर’ या फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ श्री. गोयल यांच्या हस्ते भादा येथील जिल्हा परिषद शाळेत झाला. यावेळी आमदार श्री. धीरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख हे दुरदृष्य प्रणालीद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते.

श्री. गोयल म्हणाले, वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी ‘रीड लातूर’ ही संकल्पना जिल्हा परिषद शाळेत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. याचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल. आमदार धिरज विलासराव देशमुख व सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी सुरू केलेले ‘रीड लातूर’चे हे कार्य अभिनंदनीय आहे. कारण कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाचनशक्ती कमी झाल्याचे निष्कर्ष पाहणीत आढळून आले आहेत. त्यामुळे शालेय मुलांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेला ‘रीड लातूर’ महत्वाचा आणि गरजेचा आहे.
श्री. धिरज देशमुख म्हणाले, महानगरात जी अत्याधुनिक पुस्तके सहज उपलब्ध होतात, ती ग्रामीण भागात मिळत नाहीत. अशी पुस्तके लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याची संकल्पना सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी मांडली. त्यातून ‘रीड लातूर’ या उपक्रमाचा जन्म झाला. सध्या प्रायोगिक तत्वावर एका शाळेत हा उपक्रम सुरू होत असला तरी येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत हा उपक्रम आम्ही घेऊन जावू.
याप्रसंगी मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. श्रीशैल उटगे, प्रवीण पाटील, उपसरपंच बालाजी शिंदे, मुख्याध्यापक रमेश अनंतवार सर, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, लेखक भारत सातपुते, शिक्षक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशव गंभीरे, मांजरा कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, रीड लातूर उपक्रमाचे समन्वयक राजू सी. पाटील, महेश तोडकर, विजय माळाळे, मंदाकिनी गंभीरे, विजयकुमार कोळी, आर. बी. चव्हाण, दत्तात्रय गिरी, माधुरी वळसे, ज्योती मुर्कीकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शामल पाटील यांच्यासह भादा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रीड लातूर टीमचे सदस्य रावसाहेब भामरे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश सुडे यांनी केले. शिवलिंग नागापुरे यांनी आभार मानले.
—-
आपली पुस्तकरुपी साथ हवी

रीड लातूर हा उपक्रम विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबाहेरचे जग दाखवणारा आहे. वाचनसंस्कृती वाढवणारा आहे. विद्यार्थ्यांना सजग बनवणारा आहे. त्यामुळे अशा उपक्रमासाठी आपल्या सर्वांची साथ असणे, हेही तितकेच महत्वाचे आहे. अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक यांनी या उपक्रमात सहभागी होऊन पुस्तकरूपी मदत केली आहे. ग्रामीण भागांत अधिकाधिक ग्रंथालय सुरू होण्यासाठी आपणही पुढं येऊन पुस्तकरुपी मदत करावी, असे आवाहन श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी केले.
—-