दिवाळी विशेष
सौ.दीपशीखा धिरज देशमुख यांची संकल्पना व आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा पुढाकार.
एके दिवशी सहज पेपर चाळत असताना एका बातमीच्या हेडिंगने माझे लक्ष वेधले. “मुलांच्या कल्पना शक्तीला चालना देण्यासाठी ग्रामीण भागात राबविणार रीड लातूर उपक्रम” असे हेडिंग वाचून मला आनंद वाटला.
“रीड लातूर” नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी पेपर थोडा जवळ आणत ती बातमी सविस्तरपणे मी वाचू लागलो, तेंव्हा समजले की,
सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम साकारला जातोय. माझ्यासह अनेकांची भावना होती की, वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे,ती जपली गेली पाहिजे याबाबतीत काही तरी व्हायला हवं.आणि नेमकं या भावनेला स्पर्श करत रीड लातूरची संकल्पना पुढे आणलेली दिसली.
वाचनामुळे व्यक्तीवर चांगले संस्कार होतात. थोर विचारवंत व महापुरुषांचे विचार वाचत असताना कळत- नकळत त्यांच्या चांगल्या विचारांचे व सद्गुणांचे अनुकरण होत राहते. वाचनामुळे व्यक्तींची माहिती व ज्ञानाचा संग्रह वाढतो.म्हणूनच वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे असे सर्वांना वाटते. “रीड लातूर” या उपक्रमाचे सर्व स्तरातून मनापासून स्वागत झाले.एक वेगळा व काळाची गरज असलेला विचार चळवळीच्या रूपाने प्रत्यक्षात साकारला जात असल्याचे पाहून अनेकांना समाधान वाटले. सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांनी व्यक्त केलेली संकल्पना व त्यास मूर्त स्वरूप देण्यासाठी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी घेतलेला पुढाकार हा मोलाचा आहे. सौ.दीपशिखा ताईंना हा विचार कसा सुचला याचा विचार मी करत असताना लक्षात आले की,कोरोना काळातील टाळेबंदीच्या दिवसात त्या स्वतः पुस्तकांचे वाचन करत आपला वेळ सार्थकी घालत होत्या. तेंव्हा त्यांनी मुलगा वंश व मुलगी दिव्यांना यांना देखील जागतिक दर्जाची नामवंत लेखकांची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली.तेंव्हा त्यांना जाणवले की, ग्रामीण भागातील मुलांना देखील अशी पुस्तके जर वाचनासाठी मिळू शकली तर त्या मुलांमध्ये देखील वाचन संस्कृती रुजण्यास मदत होईल.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आहे. वाचनाबाबत त्यांच्या मनात उत्सुकता आहे. मात्र त्यांच्यापर्यंत मोठ्या शहरात, मोठ्या शाळांमध्ये सहज उपलब्ध होणारी नवनवीन आधुनिक पुस्तके पोहोचत नाहीत. त्यामुळे याबाबतीत आपण काहीतरी करूयात या उदात्त भावनेतून रीड लातूरची सुरुवात त्यांनी केली. मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळावी व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लहान मुलांच्या विश्वातील इंग्रजी मराठी व हिंदी भाषांमधील कथा, कविता, कादंबरी व अन्य साहित्य प्रकाराची पुस्तके संकलित करण्यास सुरुवात झाली.
सौ.दीपशिखाताई स्वतः चित्रपट निर्मात्या आहेत. तसेच त्यांची स्वतःची सौंदर्य प्रसाधने निर्माण करणारी “लव ऑरगॅनिकली” ही कंपनी आहे. एवढ्या व्यस्ततेत देखील त्यांनी लातूरसाठी काहीतरी वेगळं करण्याचे ठरवले याचे अनेकांना कौतुक वाटले.
रीड लातूर उपक्रमाविषयी जेव्हा अनेकांना समजले तेंव्हा अनेकांनी या उपक्रमात पुस्तके देऊन सहभागी होण्याचे ठरवले. यात प्रामुख्याने प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोहा अली खान, लारा दत्ता, नीलम कोठारी, ताहिरा कश्यप, जगप्रसिद्ध लेखक रस्किन बाॅन्ड, ड्रीमलँड पब्लिकेशन यांनी पुस्तके देऊन या उपक्रमास चालना दिली.
रीड लातूर उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात जवळपास तीन हजार पुस्तके उपलब्ध झाली आहेत. सर्व प्रथम बाभळगाव येथील दयानंद शिक्षण संस्थेत रीड लातूरच्या कार्यालयाचे उदघाटन सौ.दीप शिखाताई देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांसोबत पुस्तकांचे वाचन करून व मुलांकडून इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचून घेऊन त्यांना पुस्तकांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी खूप कुतूहलाने त्या पुस्तकांची हाताळणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत उपक्रमशील शिक्षकांसमवेत रीड लातूर संबंधी बैठक घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती सौ दीपशिखाताई व आमदार धिरज देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे या उपक्रमात तुम्हा शिक्षक मंडळींचा सहभाग मोलाचा असणार आहे असे सांगून त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना देखील या बैठकीत घेण्यात आल्या.
रीड लातूर उपक्रमात भारत सातपुते, रावसाहेब भामरे, विजय माळाळे, केशव गंभीरे, विजयकुमार कोळी, सौ. मंदाकिनी भालके (गंभीरे), श्रीमती रंजना चव्हाण, गायकवाड आर.डी.,उमाकांत खोसे, शिवलिंग नागापुरे,सुरेश सुडे व अन्य शिक्षक मंडळींनी प्रत्यक्षपणे सहभागी होऊन रीड लातूरची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.
रीड लातुर उपक्रमासाठी आलेल्या पुस्तकांना क्यूआर कोड बारकोड व कव्हर लावण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. त्या पुस्तकांचे कव्हर पेज संगणकावर स्कॅन करून ठेवण्यात आले. जेणेकरून कोणत्या शाळेत कोणती पुस्तके दिली आहेत. हे बारकोड वरून ओळखता येईल.रीड लातूर उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात ६ एप्रिल २०२२ रोजी म्हणजेच आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,औसा तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात बाभळगाव,सारोळा,बोरी बोकनगाव, कासारखेडा, भादा, आनंद नगर, वडजी, काळमाथा, अंधोरा,ब-हाणपूर, बोरगाव नकुलेश्वर, मळवटी या गावांमधील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना रीड लातूर उपक्रमांतर्गत पुस्तके देण्यात आली. ही पुस्तके देत असताना धानोरा येथील बचत गटांच्या महिलां कडून कापडी पिशव्या शिवून घेण्यात आल्या.बाजारात कमी किमतीच्या व टीकावू पिशव्या उपलब्ध असताना देखील ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार मिळावा या भावनेतून सौ.दीपशिखाताई देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार गरजू महिलांना पिशव्या तयार करण्याचे काम देण्यात आले.
नावीन्यपूर्ण व विविध कथाकवितांच्या पुस्तकांच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळणार असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील मुलं-मुली खूप आनंदी झाल्याचे आज पर्यंतच्या वाटचालीत दिसून आले. आठवड्यातील एक दिवस अथवा दिवसभरातील ठराविक एक तास निवडून त्यात मुलांना पुस्तके वाचनासाठी दिली जातात.पुस्तकांचे सामूहिक वाचन केले जात असल्याने मुलांमध्ये सांघिक भावना देखील वाढीस लागत आहे.
रीड लातूर उपक्रमास मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यात आणखीन चांगली दर्जेदार पुस्तके जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भविष्यात राज्य, देश व जागतिक स्तरावरील नामांकित लेखक, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, चित्रपट कलावंत अशा मंडळींकडून मुलांना काहीतरी चांगले शिकता यावे यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सेमिनार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून आपली मुलं उद्याच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कसे परिपूर्ण होतील. यासाठी प्रयत्न करण्याचा मानस “रीड लातूर” उपक्रमाच्या प्रमुख सौ. दीपशिखा धिरज देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा आहे.
रीड लातूरचा समन्वयक या नात्याने काम करत असताना खूप काही चांगले शिकायला मिळत आहे. विशेष म्हणजे वाचन संस्कृती जोपासण्यासाठीची चळवळ उभी राहत असताना व ती चळवळ यशस्वी होत असतानाच्या प्रक्रियेचा एक भाग मला होता आले याचे समाधान वाटते. लातूरने नेहमीच आपलं वेगळेपण जोपासून इतरांसाठी अनुकरणीय कार्य केले आहे.
या परंपरेतील “रीड लातूर” हा उपक्रम एक भाग आहे.
राजू सी पाटील-(समन्वयक रीड लातूर)
९०९६०९६०८९
rajkumarcpatil@gmail.com
( लेखक हे रीडचे समन्वयक व अभ्यासू संपादक आहेत )