लातूर :– विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या “रीड लातूर” उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. त्या पुस्तकाचे नियमितपणे विद्यार्थी वाचन करत असून नाविन्यपूर्ण व इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण करणारी पुस्तके वाचता येत असल्याने विद्यार्थी आनंदी झाले आहेत.

सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर ग्रामीण मधील लातूर,औसा व रेणापूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी “रीड लातूर” हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल यांच्या हस्ते ६ एप्रिल 2022 रोजी भादा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आला.


त्यानंतर पहिल्या टप्प्यात बाभळगाव, सारोळा, बोकनगाव, कासारखेडा, वडजी, काळमाथा, भादा, आंदोरा, ब-हाणपुर, बोरगाव (न),बोरी,आनंद नगर या जिल्हा परिषद शाळांमध्ये “रीड लातूर” उपक्रमांतर्गत प्रत्येकी 50 पुस्तके देण्यात आली आहेत.ही पुस्तके इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणारी व विविध प्रकारच्या कथा, कविता,प्रोत्साहनपर गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी आहेत. जगभरातील नामांकित बाल साहित्यिकांची ही पुस्तके विद्यार्थी आवडीने वाचत आहेत.संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक नियमितपणे ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी देत असून ठराविक कालावधीनंतर सदरील पुस्तके वेगवेगळ्या शाळांमध्ये दिली जाणार आहेत.

पुस्तकांप्रती वाढत असलेली विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आणखीन पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा “रीड लातूर” उपक्रमाच्या प्रमुख सौ.दीपशीखा धिरज देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी निश्चित केले आहे.
सदरील उपक्रमात सहभागी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील अशी पुस्तके समाजातील विविध घटकांनी देऊन “रीड लातूर” उपक्रमास चालना द्यावी असे आवाहन “रीड लातूर” समन्वय समितीचे सर्वश्री भारत सातपुते,रावसाहेब भामरे,विजयकुमार कोळी, मंदाकिनी भालके(गंभीरे), रंजना चव्हाण,विजयकुमार कोळी,विजय माळाळे, शिवलिंग नागापुरे, सुरेश सुडे व समन्वयक राजू सी पाटील यांनी केले असून अधिक माहितीसाठी ८३९०३१११११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो ओळ :- रीड लातूर उपक्रमांतर्गत लातूर तालुक्यातील बोकनगाव येथील शाळेमध्ये विद्यार्थी पुस्तकांचे वाचन करतेवेळी.