◆गणित विषय मानवी जीवनाचा अविभाज्य भाग : कमलकिशोर कदम◆
●गणित विषयातील संशोधन अनेकांसाठी प्रेरणादायी : प्रो.नीना गुप्ता●
छत्रपती संभाजीनगर दि.२८ : गणित हा विषय माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून आपल्या संपूर्ण जीवनकाळात गणिताचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन आज येथे महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ व प्रो. ठाकरे गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा देशपातळीरील ‘द्वितीय गणितरत्न २०२३’ हा पुरस्कार प्रो.नीना गुप्ता यांना आज येथे प्रदान करण्यात आला.
आज विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. रोख एक लक्ष अकरा हजार रुपयाचे पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन प्रो. गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. कदम म्हणाले, आपण गणित का शिकतो हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता गणित हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असून जीवनभर आपल्याला गणिताचा वापर करावा लागतो.
श्रीमती गुप्ता म्हणाल्या, मला गणितरत्न हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातोय याचा मनस्वी आंनद आहे. या पुरस्काराचे श्रेय मी माझे शिक्षक, परिवार आणि माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांना देते. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानते. गणित विषयात मी करीत असलेल्या संशोधनातून अनेकांना गणित विषयात काम करण्याची प्रेरणा मिळतेय याचा मला आनंद आहे.
यंदाच्या गणितरत्न पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर असून या पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तीने गणित विषयामधे भरीव व मूलभूत असे काम केलेले असते. भारतीय नागरिकांसाठी असलेल्या या पुरस्कारासाठी वयाचे बंधन नाही. गणित विषयात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या पुस्काराची सुरुवात करण्यात आली आहे , असे प्रो.एन. के.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यास महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, आमदार सतीश चव्हाण, सोलापूर येथील उद्योजक व लक्ष्मी हायड्रॉलिकचे संस्थापक शरद ठाकरे, प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेचे सचिव प्रा. बी. एन. वाफारे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व सबंधित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आरती साळुंखे, प्रा.कोमल जहागीरदार; प्रास्ताविक प्रा. बी.एन. वाफारे तर आभार प्रदर्शन डॉ.आसावरी मांजरेकर यांनी केले. अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख यांनी एमजीएम विद्यापीठातर्फे मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनर, विभागप्रमुख डॉ. विनीता आरोळे, डॉ.जी.सी.लोमटे व संबंधितांनी योगदान दिले.