लातूर: महाराष्ट्र राज्य स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर येथील सेवानिवृत्त शिक्षक डॉ. अजय महाजन यांची निवड करण्यात आली आहे. या समितीला शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिनांक २४ मे २०२३ रोजी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशानुसार सदर नामांकन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण हे देशाच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वाचे वळण आहे ज्याने, देशातील शैक्षणिक आकृतीबंध पूर्णपणे बदलून टाकला आहे. हे धोरण कौशल्य आधारित गुणवत्तापूर्ण समग्र शिक्षण देण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करते.
राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य म्हणून, डॉ. महाजन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी राज्यासाठी उपयुक्त अशा योजना, धोरणे आणि रचना विकसित करण्यासाठी इतर प्रख्यात शिक्षण तज्ज्ञासोबत काम करतील.
आपली कृतज्ञता आणि वचनबद्धता व्यक्त करताना डॉ. अजय महाजन म्हणाले की, ” राज्यातील शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये नामांकन मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याची योग्य दखल घेतली या बद्दल समाधान वाटते. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च दर्जाचे आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी सदस्य या नात्याने कटिबद्ध राहून कार्य करू.”
राज्य सुकाणू समितीवर डॉ. महाजन यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.